धाराशिव : धाराशिवमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मागणीनंतर दत्ता कुलकर्णी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सोमनाथ गुरव यांनी “तुमच्या नेत्यांनी आणलेल्या लेदर पार्कचे काय झाले आणि टेक्निकल टेक्स्टाईल पार्क अजून का होत नाही , याची माहिती आधी द्यावी,” असे थेट आव्हान दिले आहे. कुलकर्णी यांनी लॉजिस्टिक पार्कच्या विरोधात घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे गुरव यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरव यांनी कुलकर्णी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “लॉजिस्टिक पार्कच्या मागणीचे निवेदन दिल्यानंतर तुमच्या मालकाला एवढा पोटशूल उठेल असे वाटले नव्हते. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी तुमच्या नेत्यांची अवस्था झाली आहे.” गुरव यांनी कुलकर्णी यांना आव्हान दिले की, त्यांनी एक सविस्तर पत्रकार परिषद घेऊन डॉ. पाटील आणि राणा पाटील यांनी आजवर आणलेले प्रकल्प आणि त्यांची सद्यस्थिती यावर प्रकाश टाकावा.
गुरव यांनी जुन्या प्रकल्पांची आठवण करून देत म्हटले की, “जिल्ह्यातील लेदर पार्क, मोझर बेअर, मोपेड आणि व्हिडीओकॉन यांसारखे मोठे प्रकल्प कुठे आहेत, हे आधी दाखवा. शासकीय पैशाने इटलीसारखे परदेश दौरे करून काय फायदा झाला, हे तुम्ही तुमच्या मालकांना विचारून जनतेसमोर मांडावे.”
लॉजिस्टिक पार्कच्या मागणीचे समर्थन करताना गुरव म्हणाले, “स्थानिक खासदार आणि आमदार यांनी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या प्रकल्पाची मागणी केली आहे. जर हा प्रकल्प चुकीचा असता, तर गडकरी साहेबांनी राज्य सरकारकडून प्रस्ताव मागवला असता का? तुमच्या मालकाच्या आणि तुमच्या कुजक्या मनोवृत्तीचे दर्शन या निमित्ताने जिल्ह्याला झाले आहे.”
“सत्ताधारी असणे म्हणजे सरकार आपल्या मालकीचे नसते, हे साधे तत्त्वही ज्यांना कळत नाही, त्यांच्यावर अधिक बोलणे योग्य नाही,” अशा शब्दांत गुरव यांनी आपली भूमिका स्पष्ट करत टीकेला पूर्णविराम दिला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.