धाराशिव: मित्राविरुद्धच्या गुन्ह्यात सह-आरोपी न करण्याच्या मोबदल्यात एका शेतकऱ्याकडून तब्बल ५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकलेल्या लोहारा पोलीस ठाण्यातील चौघा पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी आज (दि. १३) हे निलंबनाचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे धाराशिव पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये लोहारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भिमराज कुकलारे, सहाय्यक फौजदार निवृत्ती बळीराम बोळके, पोलीस अमंलदार आकाश मधुकर भोसले आणि पोलीस नाईक अर्जुन शिवाजी तिघाडे यांचा समावेश आहे.
या सर्वांवर लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ३२१/२०२५ अन्वये भ्रष्टाचार अधिनियम सन १९८८ च्या कलम ७, ७(अ), आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्याच्या आधारे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.
हे आहे संपूर्ण प्रकरण
दि. ११ नोव्हेंबर रोजी, पुणे आणि सोलापूर एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली होती. तक्रारदार (वय ३२, शेतकरी) यांच्या मित्राविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात तक्रारदाराला सह-आरोपी न करण्यासाठी, वरील चौघा लोकसेवकांनी त्याच्याकडे ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने सुरुवातीला स्वतःचे १० तोळे वजनाचे सोन्याचे कडे काढून दिले. त्यानंतरही आरोपींनी तक्रारदाराच्या भावाकडून परस्पर ४ लाख रुपये उकळले. एवढ्यावरच न थांबता, एपीआय कुकलारे यांनी तक्रारदाराकडे आणखी २ लाख रुपयांची मागणी सुरूच ठेवली.
या सततच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने पुणे एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, मंगळवारी (दि. ११) सायंकाळी लोहारा तालुक्यातील भातांगळी येथील तक्रारदाराच्या शेतात सापळा लावला.
यावेळी, एपीआय कुकलारे यांच्या सांगण्यावरून पोलीस नाईक अर्जुन शिवाजी तिघाडे याने तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले आणि त्यानंतर चौघाही आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याच्या आधारे आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.




