धाराशिव – लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. पण धाराशिव मतदारसंघात लोकसभेचा रणसंग्राम आतापासूनच पेटला आहे. पालकमंत्री तानाजी सावंत आणि खा.ओमराजे निंबाळकर यांच्यात कलगीतुरा रंगला आहे, त्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी मध्ये उडी घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
धाराशिव येथे रविवारी महायुतीचा मेळावा पार पडला होता. त्यावेळी पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. ओमराजे हे अपघाताने खासदार झाले असून, फसवून खासदार झाले आहेत. त्यांनी पाच वर्षात एकही योजना आणली नाही. आता ते माजी खासदार होतील, असे म्हटल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
त्याला प्रतित्तर देताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, कोणाला आजी आणि कुणाला माजी करायचं हे मतदार ठरवतील, घोडामैदान जवळ आहे. पहिले तुम्ही पैलवान तरी जाहीर करा, असे खुले आव्हान दिले आहे.
त्यावर उत्तर देताना भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी , मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेने विजयी झालेल्या ओमराजे निंबाळकर यांना एक सामान्य भाजप कार्यकर्ता पराभूत करेल, असे म्हटले आहे. त्यावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते सोशल मीडियावर तुटून पडले आहेत.
पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर आणि त्याला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलेल्या प्रतित्तरामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभेचा रणसंग्राम आतापासून पेटला असून, आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे फिक्स आहेत तर महायुतीकडून कोण उभे राहणार याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.
हे आहेत भाजपकडून इच्छूक
आ. राणा जगजितसिंह पाटील, सौ. अर्चनाताई पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, बसवराज मंगरुळे
भाजप मध्ये प्रवेश झाल्यास
माजी आमदार बसवराज पाटील
शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक
माजी खासदार रवींद्र गायकवाड, पालकमंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत