धाराशिव – तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असलेला निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचा रु 113.53 कोटी अंदाजपत्रकीय किमतीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून या प्रस्तावावर जलसंपदा सचिवांची स्वाक्षरी झाली आहे. जुलै महिन्यातच या कामाची निविदा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशीव तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी आदरणीय डॉ. पद्मसिंहजी पाटील साहेब यांनी निम्न तेरणा उपसा सिंचन योजना राबविली होती. देखभाल दुरुस्ती अभावी ही योजना जवळपास मागील 12 वर्षा पासून बंद आहे. या योजनेद्वारे माकणी धरणातील पाणी करजखेडा, वडाळा, बामणी तलावात आणून या भागातील सिंचनासाठी वापरण्यात येणार आहे.
देखभाल दुरुस्ती अभावी या योजनेची अत्यंत दुरवस्था झाली होती. स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी या तिन्ही विभागाची दुरुस्ती आवश्यक होती. अतिशय क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण करून अनेक लहान मोठ्या त्रुटी दूर करत सदरील प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या मंजुरीने राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या मंजूरी साठी पाठविण्यात आला होता. सदरील समितीने दि. ११/०१/२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावास मंजूरी दिली होती. तद्नंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून दि. ०३/०६/२०२४ रोजी विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर जलसंपदा विभागाचे सचिव श्री. दिपक कपूर यांची स्वाक्षरी झाली असून नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सदरील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त होणे अभिप्रेत आहे.
आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी उप मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची भेटून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते. या अनुषंगाने आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
धाराशिव, लोहारा व औसा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे. या योजनेचे आशिव, कानेगाव, करजखेडा, वडाळा, बामणी असे ५ टप्पे असून यामुळे ६८९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यातील ५७०० क्षेत्र केवळ धाराशिव तालुक्यातील आहे.
शासनाच्या मंजूरीसह योजनेच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी या पुढेही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.