काय बोलायचं अन् कुणाला सांगायचं? आमचं नशीबच फुटलंय बघा. धाराशिव जिल्ह्याला दुष्काळ काय नवीन नाही. कधी पाण्याविना पिकं जळत्यात, तर कधी पाण्यानंच जीव घेत्यात. यालाच कोरडा अन् ओला दुष्काळ म्हणत्यात व्हय? यावर्षी तर आस्मानच फाटलंय जणू. वरुण राजानं अशी काय कृपा केली की सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलं. दोन दिस झालं, धो धो पाऊस असा कोसळतोय की नद्याबी आता गावात घुसायला लागल्यात. शेतकरी राजा पार कोलमडून गेलाय.
कळंब तालुक्यातली गोष्ट बघा. खोंदला गावचा सुबराव लांडगे नावाचा साठीतला शेतकरी बाप… मांजरा नदीच्या पुरात वाहून गेला. अजून पत्ता नाही. पोरंबाळं, घरदार नदीच्या काठावर डोळ्यात आसवं आणून वाट बघत्यात. एनडीआरएफची टिम आली, ड्रोन फिरत्यात, आमदार साहेब बी येऊन बघून गेले. पण गेलेला जीव परत येतोय का? पुलावरून जाताना पाय घसरला अन् पाण्याच्या राक्षसानं त्याला पोटात घेतलं. कालपासून शोध सुरू हाय, पण हाती काय लागत नाही. अख्ख्या गावावर सुतक पसरलंय.
एका सुबराव बापाचीच गोष्ट नाही ही. अख्खा तालुका, जिल्हा पाण्यात बुडालाय. तेरणा, मांजरा, वाशिरा, बाणगंगा सगळ्या नद्यांनी रौद्र रूप घेतलंय. सातेफळ, मोहा, ईटकुर, अंतरगाव, कानडी… सगळीकडं पूल पाण्याखाली गेल्यात. गावांचा संपर्क तुटलाय, माणसं अडकून पडल्यात. रानंच्या रानं पाण्याखाली गेल्यात. हाता-तोंडाशी आलेलं सोयाबीन, मूग, उडीद, ऊस सगळं कुजून गेलं. डोळ्यादेखत पिकं वाहून जाताना बघण्यापलिकडं शेतकरी काय करणार? रक्ताचं पाणी करून, उसने-पासने करून पीक उभं केलं होतं, पण एका रात्रीत सगळं गेलं.
सरकारला आमची दया येते का नाही, कुणास ठाऊक! आधी म्हणले एक रुपयात पीक विमा. नंतर म्हणले हेक्टरी १२०० रुपये भरा. गरिबानं उसनवारी करून तेबी भरलं. आता काय? पंचनामे होणार, साहेब लोकं येणार, फोटो काढून जाणार. पण आमच्या पदरात काय पडणार? ती मदत मिळायला किती महिने लागतील? तोपर्यंत आम्ही काय खायचं? पोराबाळांना काय घालायचं?
एक गोष्ट लई विचित्र हाय बघा. एकीकडं आमची पिकं, घरंदारं, माणसं पुरात वाहून चालल्यात अन् दुसरीकडं नळदुर्गच्या किल्ल्यात नर-मादी धबधबा बघायला लोकांची गर्दी उसळलीय. त्यांच्यासाठी त्यो पावसाळा ‘नयनरम्य’ हाय, अन आमच्यासाठी ‘जीवघेणा’. त्यांच्या डोळ्यात कौतुक हाय अन् आमच्या डोळ्यात फक्त पाणी. पुराच्या पाण्यानं आमच्या काळजाचं पाणी पाणी झालंय.
मायबाप सरकार, आता तरी आमच्याकडं बघा. नुसतं पंचनाम्याचं नाटक नका करू. जे वाहून गेलंय, जे सडून गेलंय, त्याची भरपाई द्या. नाहीतर या ओल्या दुष्काळात शेतकरी जिवंतपणीच मरणार. आभाळ फाटलंय खरं, पण आता ते शिवारातलं पाणी आमच्या डोळ्यांत उतरलंय. आता हे आसवांचे पूर कोण थांबवणार?
- शिवारातला गडी
( हा लेख धाराशिव लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांनी लिहिला आहे. )