वाशी : प्रेमविवाहाच्या कारणावरून एका व्यक्तीला जीवघेणी मारहाण केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील सारोळा येथे घडली आहे. फिर्यादीच्या मुलाने आरोपींच्या भाचीसोबत प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून, पाच जणांनी संगनमत करून कोयता आणि कुऱ्हाडीसारख्या प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सारोळा शिवारातील एका गोठ्यावर घडली. फिर्यादी कमल अशोक कवडे (वय ५२) यांचा मुलगा आणि आरोपींच्या भाचीने काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी कट रचला.
आरोपी सचिन वामन कवडे, नितीन वामन कवडे, वर्षा नितीन कवडे, राजश्री सचिन कवडे आणि शकुंतला वामन कवडे (सर्व रा. सारोळा) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून अशोक संपत्ती कवडे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता व कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या भ्याड हल्ल्यानंतर, पीडित महिलेने २४ ऑगस्ट रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार (कलम १०९ (१), ११८(२), ३५२, ३५१(२), ३५२, (३), १८९ (२), १९१(३), १९०) गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.