तामलवाडी – “माझ्या भावाची तक्रार का घेत नाही?” असा जाब विचारत पोलीस स्टेशनच्या आवारात गोंधळ घालून महिला पोलीस हवालदाराच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना तामलवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बुधवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तामलवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात घडली. वैशाली श्रीशैल कोरे (वय ४३), ज्या तामलवाडी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत, त्या आपले शासकीय कर्तव्य बजावत होत्या.
यावेळी प्रल्हाद किसनराव पवार (रा. सावरगाव, ता. लोहा, जि. नांदेड) नामक आरोपीने पोलीस ठाण्यात येऊन “तुम्ही आमच्या भावाची तक्रार का नोंदवून घेत नाही?” या कारणावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने आरडाओरड करत फिर्यादी कोरे यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकीही दिली. या सर्व प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.
या घटनेनंतर, पोलीस हवालदार वैशाली कोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रल्हाद पवार विरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १९४(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.