धाराशिव : धाराशिव शहरातील बौद्ध स्मशानभूमीजवळ एका २५ वर्षीय तरुणाला अडवून पैशांची मागणी करत मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वजीत प्रशांत बनसोडे (वय २५, रा. भीमनगर, धाराशिव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ही घटना सोमवारी, ३० जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. विश्वजीत हे हातलाई देवी येथून आपल्या घराकडे परत येत असताना बौद्ध स्मशानभूमीजवळ त्यांना आरोपींनी अडवले.
आरोपी आकाश शहाजी बनसोडे, सुशांत शहाजी बनसोडे, आदर्श शहाजी बनसोडे, चिंट्या शेषेराव बनसोडे (सर्व रा. सावित्रीबाई फुले सोसायटी, नागनाथ रोड) आणि प्रतिक गंगावणे (रा. अजिंठा नगर) यांनी विश्वजीत यांना थांबवून पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे २०,००० रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून तेथून पळ काढला.
घटनेनंतर विश्वजीत बनसोडे यांनी तात्काळ धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२), ११५(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.