धाराशिव: ‘कंपनीचे घरबसल्या ऑनलाईन काम आहे’ असे सांगून एका ४२ वर्षीय व्यक्तीचा विश्वास संपादन करत, त्याच्या नावावर बनावट आयडी तयार करून परस्पर 25,975 रुपयांचे कर्ज मंजूर करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी विलास मधुकर देशमुख (वय ४२, रा. पोहनेर, ता. जि. धाराशिव) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. आरोपी पवन जाधव (रा. लोहारा, ता. लोहारा) याने फिर्यादी देशमुख यांच्याशी संपर्क साधला. ‘कंपनीचे घरबसल्या ऑनलाईन काम असून त्यासाठी तुमचा इंस्टाग्रामवर कंपनीचा आयडी काढावा लागेल,’ असे सांगून त्याने फिर्यादीला विश्वासात घेतले.
त्यानंतर, दि. ०१ मे २०२५ ते दि. १६ मे २०२५ या कालावधीत आरोपीने फिर्यादीस बजाज फायनान्स, धाराशिव येथे नेले. तेथे फिर्यादीच्या नावावर बनावट आयडी तयार करून 25,975 रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. ही कर्जाची रक्कम स्वतः वापरून आरोपीने फिर्यादी विलास देशमुख यांची फसवणूक केली.
आपल्या नावावर परस्पर कर्ज काढून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, देशमुख यांनी मंगळवार, दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी पवन जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३६(२), आणि ३३६(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





