वाशी – मंत्र्यांशी आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी ओळख असल्याचे भासवून, शासकीय काम मंजूर करून देण्याच्या आमिषाने एका तरुणाला तब्बल ५ लाख ९५ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणाने पैसे परत मागितले असता, त्याला जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.
याप्रकरणी पीडित प्रशांत सतिश नाईकवाडी (वय ३५, रा. भुम) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गणेश सतिश चव्हाण (रा. पाथरुड, ता. भुम) याच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश चव्हाण याने फिर्यादी प्रशांत नाईकवाडी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. ‘एका माननीय मंत्र्यांशी आणि धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी माझी जवळची ओळख आहे,’ असे सांगून त्याने नाईकवाडी यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. गावातील काही कामे दाखवून आपण जिल्हा नियोजन समितीमधून (DPC) मोठी कामे मंजूर करून देऊ शकतो, असे आश्वासन त्याने दिले.
या आश्वासनाला बळी पडून प्रशांत नाईकवाडी यांनी १३ जानेवारी २०२५ ते ४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत वेळोवेळी आरोपी गणेश चव्हाण याला ऑनलाईन पद्धतीने एकूण ५ लाख ९५ हजार रुपये दिले. मात्र, बराच काळ उलटूनही कोणतेही शासकीय काम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे नाईकवाडी यांच्या लक्षात आले. त्यांनी आरोपीकडे आपल्या पैशांची मागणी केली असता, आरोपीने त्यांना पैसे देण्यास नकार देत उलट जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
अखेरीस, प्रशांत नाईकवाडी यांनी २८ सप्टेंबर २०२५ रोजी वाशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश चव्हाण याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) (फसवणूक) आणि ३५१(२) (जीवे मारण्याची धमकी देणे) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वाशी पोलीस करत आहेत.