धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील परांडा आणि तुळजापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एम.डी. ड्रग्जची वाहतूक आणि विक्री सुरू असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या घातक ड्रग्समुळे तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणाचा केंद्रीय पातळीवर तपास करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.
गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी
धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा प्रारंभी हेड कॉन्स्टेबल, नंतर पीआय आणि नंतर API कडे तपास दिला आहे. मात्र, प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मार्फत सखोल तपास करून संपूर्ण ड्रग्ज सिंडिकेट उखडून टाकावे, अशी खासदार निंबाळकर यांची मागणी आहे.
तपासासाठी सुचविलेले उपाय
१. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मार्फत धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण ड्रग्ज सिंडिकेटचा तपास करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी.
२. सोलापूर, मुंबई आणि स्थानिक ड्रग्ज पेडलर्सच्या माध्यमातून एम.डी. ड्रग्जच्या वाहतुकीत आणि खरेदी-विक्रीत सामील असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी.
तरुणांचे भवितव्य वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन
एम.डी. ड्रग्जच्या सेवनामुळे विशेषतः तरुण वर्गाचे आरोग्य धोक्यात येत असून त्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी, अशी विनंती खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केली आहे.
या प्रकरणावर केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष घालून त्वरित उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्तेही करत आहेत.
Video