धाराशिव – आज सर्वत्र देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, धाराशिव येथे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर झालेल्या एका सत्कार समारंभाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. पालकमंत्री सरनाईक यांनी धाराशिवच्या तहसीलदार सौ. मृणाल जाधव यांचा सत्कार केला, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून त्यांची चौकशी सुरू आहे. या सत्कारामुळे जनतेच्या भावनांचा अपमान झाला असून, हा प्रकार म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासारखा आहे, असा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केला आहे.
मनोज जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, “हा सत्कार अतिशय चुकीचा आहे. केवळ आठ दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनता दरबारामध्ये सर्वाधिक तक्रारी तहसीलदार मृणाल जाधव यांच्या विरोधातच होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून त्यांना न्याय दिला नाही.”
जाधव यांनी पुढे निदर्शनास आणून दिले की, तहसीलदार जाधव यांच्यावर एन. ए. लेआउट प्रकरणात अनियमितता केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी विधानमंडळात प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार महसूल मंत्र्यांनी तहसीलदार जाधव यांना प्रथमदर्शनी दोषी ठरवत त्यांच्या चौकशीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, सध्या तपास सुरू आहे.
याशिवाय, एका अन्य सामाजिक कार्यकर्त्याने तहसीलदार जाधव यांच्यावर १०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) चौकशी सुरू आहे.
मनोज जाधव म्हणाले, “एकीकडे विविध गंभीर प्रकरणांमध्ये चौकशी सुरू असताना आणि प्रथमदर्शनी दोषी आढळल्यानंतरही पालकमंत्र्यांनी तहसीलदार जाधव यांचा सत्कार करणे म्हणजे भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना भविष्यात अधिक भ्रष्टाचार करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासारखे आहे. पालकमंत्र्यांनी हा सत्कार करताना जनतेच्या भावनांचा आणि सुरू असलेल्या चौकशी प्रक्रियेचा विचार करायला हवा होता.” या घटनेमुळे जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.