धाराशिव: शहरातील जुना बस डेपोच्या पाठीमागील शिवरत्न चौकात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून, १८ जणांच्या टोळक्याने महिला व तिच्या मुलाला लोखंडी रॉड व दांडक्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी घरातील सामानाची नासधूस करून कपाटातील ४० हजार रुपये रोख व महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले.
याप्रकरणी पार्वतीबाई राम साळुंके (वय ६०, रा. जुना बस डेपोच्या पाठीमागे, शिवरत्न चौक) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी विलास लोंढे, बिभीषण लोंढे आणि इतर १६ इसम (सर्व रा. धाराशिव) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी पार्वतीबाई यांच्या घरासमोर आले.
आरोपींनी फिर्यादी पार्वतीबाई व त्यांच्या मुलास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्यांनी, लोखंडी दांडके व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी फिर्यादीच्या घरात घुसून सामानाची नासधूस केली. घरातील कपाटात ठेवलेली रोख रक्कम ४०,००० रुपये आणि फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले. तसेच, जाताना ‘जिवे ठार मारण्याची’ धमकी दिली.
या घटनेनंतर पार्वतीबाई साळुंके यांनी दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून, धाराशिव शहर पोलीस ठाण्यात विलास लोंढे, बिभीषण लोंढे यांच्यासह एकूण १८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(2), 191(2)(3), 190, 118(1), 119(1), 333, 334(1), 324(4), 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





