धाराशिव: शहरातील बार्शी नाका परिसरात असलेल्या एका मोबाईल दुकानाचे शटर पत्र्याने कापून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, स्मार्ट घड्याळे आणि इतर साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवार (दि. २२) रात्री ते मंगळवार (दि. २३) सकाळच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी दुकानदार शुभम मधुकर इंगळे (वय २७, रा. बार्शी नाका, धाराशिव) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे यांचे नुतन शाळेजवळ गाळा क्रमांक ५ मध्ये ‘श्री मोबाईल’ नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्याने २२ सप्टेंबर रोजी रात्री १० ते २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या शटरची वरची बाजू कापून आत प्रवेश केला.
चोरट्याने दुकानातून टेक्नो, पोको, सॅमसंग आणि आयटेल कंपन्यांचे विविध मोबाईल हँडसेट, सॅमसंग आणि जेन कंपनीची स्मार्ट घड्याळे, तसेच मिनी स्पीकर असा एकूण ३५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
शुभम इंगळे यांच्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.