कळंब – तालुक्यातील मोहा येथे गावठाण जमिनीतील स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून दोन गटांमध्ये भीषण मारामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रमेश मक्कल काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात तब्बल १२० जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जाळपोळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मोहा शिवारातील गट क्रमांक ५२९ मधील गावठाण जमिनीवर घडली. फिर्यादी रमेश मक्कल काळे (वय ५४) यांच्यासह सुनिल बापु काळे, बाबई शहाजी काळे, सोजरबाई बालाजी काळे, आणि जिजाबाई गुलाब काळे हे स्मशानभूमीच्या जागेजवळ असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली.
आरोपी संदीप गौतम मडके, दयानंद अर्जुन मडके, विजय अर्जुन मडके यांच्यासह १२० जणांच्या जमावाने फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या लोकांना जातीवाचक शिवीगाळ करत, “तुम्हाला येथे जागा मिळणार नाही,” असे म्हणून लाथाबुक्यांनी आणि दगडांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी व इतर जण जखमी झाले आहेत. इतकेच नाही, तर आरोपींनी फिर्यादीच्या मालकीची मोटरसायकल जाळून मोठे नुकसान केले.
या घटनेनंतर रमेश काळे यांनी २७ ऑगस्ट रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १२० जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९०, ३२६(जी) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी) कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस पुढील तपास करत आहेत.