धाराशिव : आपल्या दुसऱ्या पतीसोबतच्या संसारात अडथळा ठरणाऱ्या अवघ्या एक वर्षाच्या पोटच्या मुलाला आईनेच १० हजार रुपयांना विकल्याची धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे घडली आहे. मुलाच्या आजीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला. सध्या मुलाच्या ताब्यावरून खरेदी करणारे कुटुंब आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण झाला असून, प्रकरण बाल कल्याण समितीपर्यंत पोहोचले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असताना तिला पहिल्या पतीपासून झालेला एक वर्षाचा मुलगा अडचण वाटू लागला. अखेर, तिने दुसऱ्या पतीच्या संमतीने मुलाला विकण्याचा निर्णय घेतला. सोलापूर येथील कांबळे कुटुंबाला तिने चक्क एका बॉण्डवर संमतीपत्र लिहून देत मुलाची विक्री केली.
आजीच्या तक्रारीने फुटले बिंग
दरम्यान, मुलाच्या आजीने (पहिल्या पतीची आई) आपली सून आणि नातू दोघेही हरवले असल्याची तक्रार मुरूम पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आजीला सोबत घेऊन या प्रकरणाचा पाठपुरावा केला असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलाला शोधून ताब्यात घेतले आणि त्याला तात्काळ बाल कल्याण समितीसमोर हजर केले.
मुलाच्या ताब्यावरून रुग्णालयात गोंधळ
मुलाची प्रकृती खालावल्याने बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार त्याला धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, येथे मुलाचा ताबा घेण्यासाठी त्याला विकत घेणारे सोलापूरचे कांबळे कुटुंब आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात जोरदार वाद झाला. रुग्णालयाच्या आवारातच दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आईवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, मुलाला विकल्यानंतर त्याच्या आईने तिसरे लग्न करून जळगावला पळ काढला आहे. या निर्दयी आईवर आणि या प्रकरणात सामील असलेल्या इतरांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मुलाची आजी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असून बाल कल्याण समितीच्या अखत्यारीत असल्याने यावर अधिक भाष्य करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. बाल कल्याण समितीच्या निर्णयानंतरच मुलाचे भवितव्य ठरणार आहे.