धाराशिव : धाराशिव बस स्थानकातील वाहनतळ जागेचा ताबा देण्यासाठी आणि कँटीनचे शटर बंद करण्यासाठी एका गुत्तेदाराकडून ९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विभागीय स्थापत्य अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. शशिकांत अरुण उबाळे (वय ४९) असे अटक करण्यात आलेल्या वर्ग-२ च्या अधिकाऱ्याचे नाव असून, ही कारवाई आज, मंगळवारी बस स्थानक परिसरात करण्यात आली.
यातील तक्रारदार हे एक ३६ वर्षीय गुत्तेदार असून, त्यांना धाराशिव बस स्थानकात वाहनतळ मंजूर झाले होते. या जागेचा ताबा देण्यासाठी तसेच त्या जागेच्या बाजूला असलेल्या कँटीनचे पार्किंगकडील शटर बंद करून देण्यासाठी विभागीय अभियंता शशिकांत उबाळे याने सुरुवातीला १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ५ हजार रुपये त्याने तात्काळ स्वीकारले होते आणि उर्वरित १० हजार रुपयांसाठी तगादा लावला होता.
या त्रासाला कंटाळून गुत्तेदाराने १८ जुलै २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी तक्रारीची पडताळणी केली असता, उबाळे याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या (डीसी साहेब) नावावर ५ हजार रुपये आणि स्वतःसाठी ४ हजार रुपये, असे एकूण ९ हजार रुपये तडजोडीअंती घेण्याचे पंचांसमक्ष मान्य केले.
त्यानुसार, आज एसीबीच्या पथकाने धाराशिव बस स्थानक आवारात सापळा रचला. तक्रारदाराकडून ९ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने उबाळे याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून लाचेची रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच, त्याच्या सोलापूर येथील अंत्रोळीनगर येथील निवासस्थानी झडती घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे.
याप्रकरणी आरोपी उबाळे विरोधात आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला लवकरच अटक केली जाईल. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली, धाराशिवचे पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक विजय वगरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.