धाराशिव: जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्यांच्या घटना घडल्या असून, यात मोबाईल फोन, दुचाकी वाहने आणि गोदामातील शेतमालाचा समावेश आहे. याप्रकरणी ढोकी, नळदुर्ग, आनंदनगर (धाराशिव), आणि वाशी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर) रोजी अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आठवडी बाजारातून मोबाईल लंपास
पहिल्या घटनेत, अमोल सुब्राव लोखंडे (वय ३२, रा. दत्ता नगर, ढोकी) हे दि. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता ढोकी येथील आठवडी बाजारात अंबाबाई मंदिराजवळ असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील २२,००० रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
गोदाम फोडून ६८ हजारांचा शेतमाल चोरला
दुसऱ्या घटनेत, नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान दिंडेगाव शिवारात मोठी चोरी झाली. बळीराम नागनाथ बिराजदार (वय ६०) यांच्या मालकीच्या ‘आई लक्ष्मी फार्मस् प्रोड्युसर कंपनी’च्या गोदामाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. चोरट्याने गोदामातील सोयाबीनची २२ पोती, उडीद २२ पोती, काबुली चना २ पोती आणि मूग २ पोती असा एकूण ६८,४०० रुपये किमतीचा शेतमाल चोरून नेला.
घरासमोरून ॲक्टिव्हा स्कुटीची चोरी
धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मनिषा चंद्रकांत जाधवर (वय ३५, रा. पोलीस लाईन, धाराशिव) यांची २०,००० रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा स्कुटी (क्र. एमएच २५ एए ४११२) दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता राहत्या घरासमोरून अज्ञाताने चोरून नेली.
हॉटेलजवळून मोटारसायकल व मोबाईल लंपास
चौथ्या घटनेत, वाशी येथून मोटारसायकलसह मोबाईल लंपास करण्यात आला. चिमाजी दगडु कुऱ्हाडे (वय ५५, रा. बेळगाव, जि. जालना) हे दि. १० ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता वाशी येथील उमग हॉटेलजवळ थांबले होते. यावेळी अज्ञाताने त्यांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एमएच २१ बी. झेड २४६३) व मोबाईल फोन असा एकूण ५०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
वरील सर्व प्रकरणांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांत करण्यात आली असून, पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.





