धाराशिव- धाराशिव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच प्रभाग क्रमांक ७-ब (सर्वसाधारण) मधील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रभागातील भाजपचे उमेदवार अमित दिलीपराव शिंदे ( शहराध्यक्ष ,भाजप) यांचा नामनिर्देशन अर्ज वैध ठरवण्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला प्रतिस्पर्धी उमेदवार कृष्णा पंडित मुंडे यांनी थेट जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे .
नेमके प्रकरण काय?
धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्र. ७-ब मधून अमित दिलीपराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शिंदे यांचा अर्ज वैध (Accept) ठरवला होता . या निर्णयावर आक्षेप घेत कृष्णा पंडित मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी आता महाराष्ट्र नगर परिषद निवडणूक नियम १९६६ च्या कलम १५ अन्वये जिल्हा न्यायाधीशांकडे धाव घेतली आहे .
निवडणूक अपील दाखल
कृष्णा मुंडे यांनी आपले प्रतिनिधी बाळासाहेब वसंतराव सुभेदार यांच्या मार्फत न्यायालयात ‘इलेक्शन अपील नंबर १/२०२५’ (Election Appeal No. 1/2025) दाखल केले आहे . २० नोव्हेंबर २०२५ रोजी दाखल करण्यात आलेल्या या अपिलामध्ये १८ नोव्हेंबरचा अर्ज स्वीकृतीचा आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे .
संबंधित पक्षकारांना नोटिसा
या प्रकरणी कृष्णा मुंडे यांच्या वतीने उमेदवार अमित दिलीपराव शिंदे , निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे प्रकरण तातडीच्या सुनावणीसाठी (Urgent Hearing) माननीय जिल्हा न्यायाधीशांसमोर ठेवण्यात येणार असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे .
या कायदेशीर लढाईमुळे प्रभाग ७-ब मधील निवडणुकीला नवे वळण मिळाले असून, आता जिल्हा न्यायालय यावर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमका आक्षेप काय?
हरकत अर्जानुसार, उमेदवार अमित शिंदे हे धाराशिव नगर परिषदेचे आर्थिक लाभधारक आहेत. धाराशिव नगर परिषदेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील (सिटी सर्व्हे क्र. १०५, शीट क्र. ५९) दुकान क्रमांक १४, ज्याचे क्षेत्र २७.८८ चौ.मी. आहे, या जागेच्या वापरासाठी अमित शिंदे यांनी नगर परिषदेसोबत नोंदणीकृत करारनामा (क्र. ४६१५/२०२५) केलेला आहे.
शिवशक्ती डेव्हलपर्सने बीओटी तत्त्वावर हे संकुल बांधले असून, या मालमत्तेबाबत अमित शिंदे यांचा नगर परिषदेशी थेट आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा आक्षेपार्धात करण्यात आला आहे.







