धाराशिव: धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दमदार कामगिरी करत आपल्या ताकदीची चुणूक दाखवून दिली आहे. या निवडणुकीत पक्षाने घवघवीत यश संपादन करत एकूण ८ नगरसेवक निवडून आणले आहेत. या निकालामुळे धाराशिव शहरातील जनतेने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावर आणि नेतृत्वावर आपला ठाम विश्वास व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
विजयी उमेदवारांची यादी:
विविध प्रभागांतून पक्षाच्या उमेदवारांनी विरोधकांना धूळ चारत विजय मिळवला आहे. विजयी उमेदवारांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
-
प्रभाग क्र. १ (ब): निसाबी मसुद कुरेशी
-
प्रभाग क्र. ९ (अ): रूपाली सुनील आंबेकर
-
प्रभाग क्र. १४ (अ व ब): अर्चना विशाल शिंगाडे व आयाज उर्फ बबलू शेख
-
प्रभाग क्र. १६ (अ व ब): शकुंतला अशोक देवकते व खालील गफूर कुरेशी
-
प्रभाग क्र. १७ व १८ (अ व ब): इस्माईल बाबासाहेब शेख व काझी शमीम बेगम
खलिफा कुरेशी यांची लक्षवेधी लढत
या निवडणुकीत नगराध्यक्षपदाने पक्षाला थोडक्यात हुलकावणी दिली असली तरी, उमेदवार खलिफा कुरेशी यांची लढत संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी अत्यंत प्रभावी आणि लढाऊ प्रचार करत तब्बल १८ हजारांपेक्षा अधिक मते मिळवली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.
विकासासाठी कटिबद्ध – डॉ. प्रतापसिंह पाटील
या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “हा विजय पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अहोरात्र परिश्रमाचे फळ आहे. धाराशिवच्या जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. या निकालामुळे आम्हाला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळात धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष अधिक जोमाने कार्य करेल.”
या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शहराच्या विकासाचा रोडमॅप घेऊन पुढे जाण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.






