अहो मंडळी, ऐका ऐका! धाराशिव शहरात सध्या एक कॉमेडी सर्कस सुरू आहे, पण पब्लिकला हसण्याऐवजी रडूच जास्त येतंय. झालंय काय, की आपल्या नगरपालिकेची निवडणूक तीन वर्षांपासून गायब आहे, जणू काही ती कोणत्यातरी गुप्त मिशनवर गेलीये! आता लोकशाहीचा राजाच गायब म्हटल्यावर काय, अधिकाऱ्यांनी मांडलाय स्वतःचा दरबार आणि झालेत एकदम ‘हम करे सो कायदा’ वाले मग्रूर!
शहरातले रस्ते खड्ड्यात गेलेत की खड्डे रस्त्यात आलेत, हेच कळेनासं झालंय. आणि कचऱ्याचे ढिगारे तर असे सजलेत, जणू काही ‘स्वच्छ भारत अभियाना’लाच आव्हान देतायत! हे सगळं बदलायला पाहिजे म्हणून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि काही माजी नगरसेवक (ज्यांना आता ‘माजी’ ऐकायची सवय झालीये) तीन दिवस आंदोलनाच्या मैदानात उतरले.
पहिला दिवस: ‘आमरण उपोषण!’ (पण अधिकारी म्हणाले, ‘बघू किती दम आहे?’)
दुसरा दिवस: ‘घंटानाद!’ (अधिकारी म्हणाले, ‘आम्हाला तर डीजेचा आवाज पण ऐकू येत नाही, घंटा काय चीज आहे?’)
तिसरा दिवस: थेट कचऱ्याची होळी! (अधिकाऱ्यांनी विचारलं असेल, ‘अरे व्वा! कचरा कमी करायला मदत करताय का?’)
पण आपल्या मुख्याधिकारी मॅडम? अहो, त्यांना घंटा फरक पडला नाही! जणू काही कानाला हेडफोन लावून ‘ऑल इज वेल’ गाणं ऐकत बसल्या होत्या.
आता पैशाची गोष्ट ऐका. रस्त्यांसाठी आलेले तब्बल १४० कोटी रुपये दोन वर्षांपासून बँकेत नुसते आराम करत आहेत. वाटतंय, त्या पैशांना पण सरकारी बाबूंसारखं काम करायचा कंटाळा आलाय! आणि दुसरीकडे, कचरा उचलण्यासाठी वर्षाला ८ कोटी रुपये खर्च होतात, पण ते पैसे कचऱ्यासोबत कचऱ्यातच जात आहेत! कंत्राटदार भाऊ आरामात बिलं उचलतोय, मॅडम सहीचा शिक्का मारतायत, आणि शहर मात्र ‘कचरा डेपो’ बनलंय.
यात अजून एक ट्विस्ट! नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक सुनील कांबळे साहेब वर्षभरापूर्वी रिटायर झाले. आता आरोग्याचा मामला, पण मॅडमनी चार्ज दिला थेट त्यांच्या लाडक्या विद्युत अभियंत्याला – कौस्तुभ घडे साहेबांना! आता बोला! इलेक्ट्रिक इंजिनिअर बघणार लोकांचं आरोग्य! काय कनेक्शन आहे देव जाणे! कदाचित बोगस बिलांना ‘शॉक’ देऊन पास करत असतील! गणेश माहेर नावाचे नवीन आरोग्य निरीक्षक मुंबईहून आले, पण त्यांना पद मिळालं तरी पॉवर नाही. सगळा कंट्रोल ‘इलेक्ट्रिक’ साहेबांकडेच! ऐकीव माहितीनुसार, मॅडम आणि घडे साहेबांची म्हणे दोन ‘चिंधीचोर’ (असं लोक म्हणतात!) कंत्राटदारांसोबत पार्टनरशिप पण आहे! (आता खरं खोटं देव जाणे!)
आणि मॅडम तर धाराशिवला राहतच नाहीत! रोज ९० किलोमीटर दूर लातूरहून सरकारी गाडीने येतात-जातात. घडे साहेब पण लातूरचेच! दोघंही कधीकधी एकत्र ‘बुट्टी’ मारतात म्हणे! मग काय, ठेकेदार मंडळी थेट लातूर वारी करून बिलांवर सह्या आणतात. ‘होम डिलिव्हरी’ म्हणतात ती हीच का?
लोक बिचारे बोंबलतायत, आंदोलनं करतायत. शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी तर मॅडमची ‘नार्को टेस्ट’ करा अशी मागणी केलीये. पण मॅडम कुणाला भीक घालत नाहीत. तुम्ही कितीही तक्रारी करा, त्या ऐकतात पण उत्तर देत नाहीत. त्यांना शहराचं काही देणं-घेणं नाही, फक्त ‘पाकीट’ गरम पाहिजे, की झाल्या खुश!
तर, धाराशिवकरांनो, काय म्हणता? आता पुढचं आंदोलन कोणतं करायचं? रॉकेट लॉंचिंग की आणखी काही? तोपर्यंत ‘मॅडम आणि कंपनी’चा हा विनोदी (पण तितकाच गंभीर) खेळ सुरूच राहणार!