मंडळी, निवडणुक आयोगाचा ‘बिगुल’ वाजू द्या किंवा न वाजू द्या, आपल्या महाराष्ट्रात राजकीय ‘शिट्ट्या’ आणि ‘पिपाण्या’ वाजायला मुहूर्त लागत नाही. सध्या धाराशिव जिल्ह्याचा ‘सिनेमा’ तर सुपरहिट चालू आहे. विषय आहे नगर पालिका निवडणुकीच्या निकालाचा, पण राडा मात्र आगामी जिल्हा परिषदेचा चालू झालाय. मैदान? अर्थातच, मार्क झुकरबर्गचा आखाडा… म्हणजेच ‘फेसबुक’ आणि ‘इंस्टाग्राम’!
आईस्क्रीम कोन आणि नावाचा सट्टा!
नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपने आणि शिंदे गटाने जोराचा ‘धुरळा’ उडवला. राणादादांच्या नेतृत्वाखाली कमळ फुललं, हे बघून भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह असा उतू चाललाय की बास! यातच एंट्री झाली राणादादांचे सुपुत्र मल्हार पाटील यांची. विजयाच्या गुर्मीत त्यांनी थेट ठाकरे गटाच्या ‘मशाली’ला ‘आईस्क्रीमचा कोन’ म्हणून हिणवलं. आता भर उन्हाळ्यात आईस्क्रीम ठीक आहे हो, पण पेटत्या मशालीला थंडगार आईस्क्रीम म्हणणं म्हणजे ‘पोलिटिकल फिजिक्स’चा नवीन शोधच म्हणावा लागेल!
वर मल्हाररावांनी ओपन चॅलेंज दिलंय- “जिल्हा परिषद अध्यक्ष आमचाच होणार, नाही झाला तर नाव बदलेन!” आता राजकारणात ‘नाव बदलणे’, ‘मिशी काढणे’ आणि ‘सन्यास घेणे’ या घोषणा म्हणजे चायनीज वस्तूंसारख्या असतात, कधीही तुटू शकतात. पण तरीही चॅलेंज ते चॅलेंज!
आई, मला अध्यक्ष व्हायचंय!
मल्हाररावांच्या या ‘आईस्क्रीम’ थिअरीला युवा सेनेच्या मनीषा वाघमारे यांनी जे उत्तर दिलंय, त्याला ‘मिसाईल अटॅक’ म्हणायला हरकत नाही. त्या म्हणाल्या, “मल्हारराव, चॅलेंज स्वीकारलं, पण अट एकच… उमेदवार तुमच्या घरातली नको!” म्हणजे काय तर, ‘माजी उपाध्यक्ष’ असलेल्या आईसाहेबांना (अर्चना पाटील) बाजूला ठेवा आणि एखाद्या सर्वसाधारण ताईला निवडून आणून दाखवा. थोडक्यात काय, तर “बॅटिंगला या, पण तुमची हक्काची बॅट घरी ठेवून या!” आता हे चॅलेंज ऐकून भाजपच्या गोटात नक्कीच खलबतं सुरू झाली असतील.
‘बाळ नाद नाय करायचा’ आणि प्राण्यांची गोष्ट
इथवर थांबतील ते कार्यकर्ते कसले? भाजपवाल्यांनी शहरात होर्डिंग लावले- “बाळ नाद करायचा नाही!” त्यावर फोटो कुणाचे? तर पद्मसिंह पाटील, फडणवीस आणि राणादादांचे. हे होर्डिंग म्हणजे थेट साऊथच्या पिक्चरचा डायलॉग वाटतोय. उद्देश स्पष्ट होता- खासदार ओमराजेंना डिवचण्याचा.
पण याला उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाच्या श्वेता दुरुगकर यांनी थेट ‘नॅशनल जिओग्राफिक’ चॅनेलच चालू केलं. त्या म्हणाल्या, “अहो, उंट खाली बसला म्हणून तो गाढवापेक्षा बुटका ठरत नाही!”
आता बघा, एका बाजूला ‘आईस्क्रीम कोन’, दुसऱ्या बाजूला ‘बाळ’, तिसऱ्या बाजूला ‘उंट’ आणि चौथ्या बाजूला ‘गाढव’. धाराशिवच्या राजकारणाचे रूपांतर हळूहळू प्राणी संग्रहालयात आणि आईस्क्रीम पार्लरमध्ये होत आहे की काय, अशी शंका येतेय!
फ्लॅशबॅक आणि क्लायमॅक्स
गंमत म्हणजे, ही सगळी उलेदाली ज्यांच्यासाठी चालू आहे, त्या ओमराजेंनी लोकसभेला भाजपची (आणि राणादादांच्या अर्धांगिनींची) सव्वा तीन लाखांनी ‘विकेट’ काढली होती. तेव्हा भाजपची अवस्था ‘लो-बॅटरी’ झाली होती. आता नगर पालिकेत विजय मिळताच भाजप ‘फास्ट चार्जर’ लावल्यासारखा चार्ज झालाय.
थोडक्यात काय, तर लोकसभेला ज्यांनी ‘सिक्सर’ मारली, ते आता नगर पालिकेच्या ‘गुगली’वर बीट झालेत. आणि ज्यांनी आता गुगली टाकली, ते जिल्हा परिषदेच्या फायनल मॅचची स्वप्ने बघत आहेत.
जनतेचं काय? जनता बिचारी हातात पॉपकॉर्न घेऊन सोशल मीडियावरची ही ‘दंगल’ एन्जॉय करतेय. आता जिल्हा परिषदेला ‘उंट’ उठून पळणार की ‘आईस्क्रीम’ वितळणार, हे पाहणं मात्र भारी ठरणार आहे! तोपर्यंत… “नाद करायचा नाय!”
– बोरूबहाद्दर






