धाराशिव: प्रवासादरम्यान दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने कृष्णा शिवशंकर कोरे या तरुणाची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करणाऱ्या तीन आरोपींना धाराशिव न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. ठुबे यांनी हा निकाल दिला, ज्यामध्ये प्रत्येक दोषीला ११,००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ११ महिने अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
रमेश भगवान मुंडे (वय ३५), शिवशंकर हरिभाऊ इंगळे (वय २७) आणि अमोल अशोक मुंडे (वय ३१) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
अशी घडली घटना
प्रकरणाची सुरुवात १८ नोव्हेंबर २०२१ रोजी झाली, जेव्हा शिवशंकर कोरे यांनी आपला मुलगा कृष्णा बेपत्ता झाल्याची तक्रार ढोकी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्याच दरम्यान, आनंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडदेवधरी शिवारात एका अज्ञात व्यक्तीचा नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता.
पोलिसांनी हरवलेल्या कृष्णाच्या तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला. न्यायालयाच्या परवानगीने मृतदेह बाहेर काढून डीएनए नमुने घेण्यात आले. हे नमुने कृष्णाचे वडील शिवशंकर कोरे आणि त्यांच्या पत्नीच्या रक्त नमुन्यांशी जुळले, ज्यामुळे मृतदेहाची ओळख पटली. यानंतर, आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असा लागला गुन्ह्याचा छडा
तपासादरम्यान, पोलिसांनी कृष्णा कोरेच्या बँक खात्यांचे तपशील तपासले असता, त्याच्या मोबाईलवरून शिंगोली येथील हॉटेल मेघदूतमध्ये ऑनलाईन व्यवहार झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन व्यक्ती कृष्णाच्या मोबाईलवरून पैसे भरताना दिसले.
या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी अमोल मुंडे आणि रमेश मुंडे यांना ओळखले आणि त्यांच्यासोबत शिवशंकर इंगळे हा तिसरा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
हत्येचा घटनाक्रम
१८ नोव्हेंबर २०२१ रोजी, तिन्ही आरोपी महिंद्रा पिकअप (क्र. एम.एच.४४-८६८४) मधून ढोकीहून धाराशिवकडे येत होते. कृष्णा त्यांच्या गाडीत प्रवासी म्हणून बसला. प्रवासात आरोपींनी कृष्णाकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. कृष्णाने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला लोखंडी टॉमीने मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेतला.
त्यानंतर, आरोपींनी कृष्णाला गडदेवधरी पाटीजवळ एका मोकळ्या पटांगणात नेले. आरोपी शिवशंकर इंगळे तेथे थांबला, तर रमेश आणि अमोल मुंडे यांनी कृष्णाचे हात दोरीने बांधून त्याचा मोबाईल घेतला आणि हॉटेल मेघदूत येथे गेले. तेथे त्यांनी दारू पिली आणि कृष्णाच्या मोबाईलवरून फोन पे द्वारे २१०० रुपयांचे पेमेंट केले. पुढे त्यांनी धाराशिव बस स्थानकावर एका रिक्षाचालकाला ३५०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून ३२०० रुपये रोख घेतले.
यानंतर, आरोपी पुन्हा घटनास्थळी परतले आणि त्यांनी गळा दाबून व लोखंडी टॉमीने मारहाण करून कृष्णाची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी कृष्णाच्या अंगावरील कपडे काढून त्याला नग्न अवस्थेत तिथेच सोडून दिले आणि त्याचे सर्व साहित्य रस्त्याच्या कडेला फेकून दिले.
न्यायालयीन प्रक्रिया
या प्रकरणात पोलीस निरीक्षक टी. बी. दराडे, ए. टी. चिंतले, डी. बी. पारेकर, सहायक पोलीस निरीक्षक बी. के. बलय्या आणि पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील महेंद्र बी. देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांनी एकूण २७ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने १८ सप्टेंबर २०२५ रोजी तिन्ही आरोपींना कलम ३०२ (खून) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.