धाराशिव: रविवारी जाहीर झालेल्या धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या निकालात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला खातेही उघडता आले नाही, पक्षाच्या पदरी केवळ ‘भोपळा’ पडला आहे.
२० उमेदवारांचा पराभव
या निवडणुकीसाठी शिवसेनेने (शिंदे गट) जोरदार तयारी केली होती. पक्षाचे १६ अधिकृत उमेदवार आणि ४ पुरस्कृत उमेदवार असे एकूण २० उमेदवार रिंगणात होते. मात्र, या सर्वच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
विशेष म्हणजे, शिंदे गटाचे शहरातील प्रमुख नेते सुधीर पाटील यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका प्रेमाताई पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्हाप्रमुखांची प्रतिक्रिया
या निकालानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पराभव होऊनही त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
सुरज साळुंखे म्हणाले, “धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत विजय झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन. आमच्या १६ अधिकृत आणि ४ पुरस्कृत उमेदवारांना शहरातील ८००० मतदारांनी मतदानरुपी जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. तसेच या निवडणुकीत कष्ट घेतलेले सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांचेही आभार.”
निकाल काहीही लागला तरी धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असेल, असेही साळुंखे यांनी स्पष्ट केले आहे.






