धाराशिव : राजकारणात काहीही होऊ शकतं, पण धाराशिवच्या राजकारणात जे होतं, ते पाहून ‘ब्रह्मदेवालाही’ प्रश्न पडावा! राष्ट्रवादी शरद पवार गटात सध्या ‘भाकरी फिरवल्याचा’ दावा केला जात असला, तरी इथली परिस्थिती ‘भाकरी फिरवली की करपली?’ अशी झाली आहे. एका जिल्हाध्यक्षाने ‘चप्पल’ सोडून आंदोलन सुरू करताच, पक्षाने त्यांनाच ‘सोडून’ नवीन जिल्हाध्यक्ष नेमला आहे. या सगळ्या ‘चप्पल-चमत्कार’ प्रकरणाचा हा ‘हट-के’ रिपोर्ट…
अंक पहिला: ‘भाकरी’ आणि ‘खुर्ची’
सुरुवात झाली राष्ट्रवादीच्या फुटीपासून. ‘ओरिजनल’ जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार ‘घड्याळा’सोबत गेले, तेव्हा ‘तुतारी’ फुंकण्यासाठी संजय पाटील दुधगावकर यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ पडली. पण हा ‘मधुचंद्र’ फार काळ टिकला नाही.
नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर, संजय पाटलांनी पक्षाकडे “सबकुछ ठीक है, पण आठ पैकी दोन नगराध्यक्षपदाच्या खुर्च्या आम्हाला पाहिजेत” असा ‘प्रेमळ’ हट्ट धरला. पण पक्षाने या मागणीकडे ‘लक्ष’ द्यायलाही वेळ दिला नाही. मग काय, पाटील म्हणाले, “तुम्ही खुर्च्या देत नाही, तर आम्ही ‘अध्यक्षपद’ सोडतो !”
त्यांनी तडक जिल्हाध्यक्षपदाचाच नाही, तर पक्षाच्या ‘प्राथमिक सदस्यत्वाचाही’ राजीनामा फेकला. त्यांच्यासोबत संजय निंबाळकर यांनीही ‘राम राम’ ठोकला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘सेनापतीच’ निघून गेल्याने, ही भाकरी ‘फिरवल्या’ गेली नसून ‘करपून’ गेली, अशी चर्चा सुरू झाली.
अंक दुसरा: ‘चप्पल’ पुराण (भूतकाळ आणि वर्तमान)


पण खरी गंमत जिल्हाध्यक्ष बदलण्यात नाही, तर माजी जिल्हाध्यक्षांच्या ‘चपलांमध्ये’ आहे!
वर्तमान: ‘अनवाणी’ सत्याग्रह
संजय पाटलांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ‘आत्मक्लेश’ आंदोलन सुरू केले आहे. “जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही,” अशी ‘भीष्म प्रतिज्ञा’ त्यांनी केली आहे. सध्या ते जिल्हाभर ‘अनवाणी’ पायाने फिरत आहेत. (या प्रतिज्ञेमुळे सरकारला घाम फुटेल की नाही, हे माहीत नाही, पण धाराशिवच्या चप्पल विक्रेत्यांना मात्र नक्कीच फुटला असेल!)
भूतकाळ: ‘आक्रमक’ चप्पल
आता इथंच खरा ‘ट्विस्ट’ आहे! संजय पाटलांचा आणि ‘चपलेचा’ हा काही पहिलाच ‘सामना’ नाही. हे नातं जरा जुनं, ‘ऐतिहासिक’ आणि ‘आक्रमक’ आहे. पंचवीस वर्षांपूर्वी, जेव्हा पाटील काँग्रेसमध्ये होते, तेव्हा त्यांचे कट्टर राजकीय विरोधक (डॉ. पदमसिंह पाटील) यांच्यासोबत त्यांचा ३६ चा आकडा होता. ‘तेरणा’ कारखान्याच्या सभेत, याच संजय पाटलांनी भर सभेत संतापाच्या भरात डॉ. पाटलांच्या दिशेने ‘चप्पल फेकून’ मारल्याचा किस्सा आजही जिल्ह्यात ‘चवीने’ सांगितला जातो.
…आणि हा ‘चप्पल-चमत्कार’
नियतीचा खेळ बघा! एकेकाळी ज्यांनी संतापाने ‘चप्पल फेकली’ होती, आज तेच पाटील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ‘चप्पल सोडून’ बसले आहेत. राजकारणातील हा ‘चप्पल-चमत्कार’ पाहून धाराशिवकरही चक्रावले आहेत.
अंक तिसरा: ‘भाकरी’चा नवा थाळा


इकडे संजय पाटील ‘अनवाणी’ फिरत असतानाच, पक्षाने वेळ वाया घालवला नाही. प्रदेशाध्यक्ष बदलताच (जयंत पाटील गेले, शशिकांत शिंदे आले), त्यांनी तातडीने धाराशिवचा ‘करपलेला’ तवा बदलला.
आता ‘आंदोलनजीवी’ पाटलांऐवजी, ‘उद्योजक’ आणि ‘शिक्षण सम्राट’ अशी ओळख असलेल्या डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे. मुंबईत शशिकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांनी नियुक्तीपत्रही घेतले. म्हणजे, एका ‘चप्पल-त्यागी’ पाटलांची जागा दुसऱ्या ‘शिक्षण-सम्राट’ पाटलांनी घेतली आहे.


सध्या तरी, राष्ट्रवादीची ‘जुनी भाकरी’ (संजय पाटील) अनवाणी फिरत आहे आणि ‘नवी भाकरी’ (प्रतापसिंह पाटील) तव्यावर टाकण्यात आली आहे. पण या सगळ्यात धाराशिवकरांना एकच प्रश्न पडलाय… “ही भाकरी खरंच ‘फिरवली’ आहे की ‘करपल्यामुळे’ नवीन थापली आहे?”
उत्तर काहीही असो, तोपर्यंत… “चपला सांभाळा!”





