धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातून लैंगिक अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. नळदुर्ग आणि शिराढोण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोन्ही घटनांमध्ये महिलांना लक्ष्य करण्यात आले आहे.
नळदुर्ग: लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने २४ जुलै २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, गावातीलच एका तरुणाने १ जानेवारी २०२४ ते ३१ मे २०२५ या कालावधीत तिच्याशी संपर्क साधला. “तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशी लग्न करणार आहे,” असे आमिष दाखवून त्याने तिला आपल्या घरी बोलावून घेतले. तिथे त्याने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एम), ७४, ३५१(२) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शिराढोण: फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २० वर्षीय महिलेवर अत्याचार
दुसरी घटना शिराढोण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, येथे एका २० वर्षीय विवाहित महिलेवर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडितेने २४ जुलै २०२५ रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ मे २०२५ ते २४ जुलै २०२५ या कालावधीत गावातील दोन तरुणांनी तिचे बाथरूममधील फोटो पतीला पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीने घाबरलेल्या पीडितेला त्यांनी मोटरसायकलवर बसवून नेले आणि तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.
पीडितेच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ६४(२)(एम), ८७, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.