परंडा – “धानाजी पवार याला पोलिसांच्या हवाली का केले?” याचा जाब विचारत एका ६५ वर्षीय महिलेसह अन्य दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील इडा येथे घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीच्या डोक्यावर पिस्तुलाने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना ४ ऑक्टोबर रोजी घडली असून, याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात ९ जणांसह अन्य ५ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुदामती जयसिंग शिंदे (वय ६५, रा. इडा, ता. भूम) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुदामती शिंदे आणि सागर जयसिंग शिंदे हे ४ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास इडा येथील साखर कारखान्यासमोरील हॉटेल सातबारा समोर उभे होते. यावेळी आरोपी लखन कांतीलाल पवार, बॉबी देओल उर्फ बाबासाहेब पवार, उमेश पवार, मुकेश पवार, आदेश पवार, धिरज पवार, कांतीलाल पवार, लायन सखाराम भोसले (सर्व रा. सावदरवाडी, ता. परंडा) आणि इतर पाच अनोळखी इसम स्कुटी आणि टाटा नेक्सॉन कारमधून त्याठिकाणी आले.
आरोपींनी फिर्यादीला “तुम्ही धानाजी झकिऱ्या पवार याला पोलिसांना का धरून दिले?” असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व इतरांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केली. याचवेळी, आरोपी लखन पवार याने त्याच्या हातातील पिस्तुलाने राहुल बाबुराव भोसले यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, उपस्थित सर्वांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या हल्ल्यानंतर जखमी सुदामती शिंदे यांनी ६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांन्वये, तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.