धाराशिव: “हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जाएगा” अशा गगनभेदी घोषणांनी आज, शुक्रवार, २३ मे रोजी धाराशिव शहर देशभक्तीच्या वातावरणात भारून गेले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आयोजित तिरंगा रॅलीला नागरिक, महिला, विद्यार्थी आणि माजी सैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
काळा मारुती चौकात मारुतीरायाच्या आरतीने रॅलीचा शुभारंभ झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना पुष्पहार अर्पण करत राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली. रॅलीतील मुख्य आकर्षण ठरली भारत मातेच्या वेशात सजलेली विद्यार्थिनी. हातात तिरंगा घेऊन तिने दिलेला देशप्रेमाचा संदेश उपस्थितांच्या मनाला भिडला. या रॅलीत महाविद्यालयीन तरुण-तरुणी, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद पाटील, ॲड. नितीन भोसले, ॲड. अनिल काळे, युवा मोर्चाचे राजसिंहा राजेनिंबाळकर, सतीश दंडनाईक, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य श्री. माने, श्री. होळकर, श्री. पाटील, श्री. भन्साळी, राजेश जाधव, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला. धाराशिवच्या नागरिकांनी या रॅलीला दिलेल्या प्रतिसादामुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. अशा उपक्रमांमुळे राष्ट्रीय अभिमान आणि समाजात एकात्मतेची भावना अधिक दृढ होते, जे आजच्या काळात विशेष महत्त्वाचे ठरते.