धाराशिव: मार्च २०२४ मध्ये वाशी तालुक्यातून अपहरण करण्यात आलेल्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची दीड वर्षांनंतर सुखरूप सुटका करण्यात धाराशिव पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेला यश आले आहे. याप्रकरणी आरोपी सुनिल लक्ष्मण धोत्रे याला अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) येथून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ऊसतोड कामगार कुटुंबातील असून, १८ मार्च २०२४ रोजी रात्री दीडच्या सुमारास आरोपी सुनिल धोत्रे याने तिला अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून २३ मार्च २०२४ रोजी वाशी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३६३ आणि ३७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांनी १८ ऑगस्ट २०२५ रोजी या प्रकरणाचा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग केला. कक्षाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी आणि पीडित मुलीचा माग काढण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान, आरोपी आणि मुलगी अहिल्यानगर शहरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पथकाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर येथे सापळा रचून आरोपी सुनिल धोत्रे याला ताब्यात घेतले आणि पीडित मुलीची सुखरूप सुटका केली. दोघांनाही आज वाशी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, महिला पोलीस हवालदार नदाफ, पोलीस हवालदार केवटे आणि पोलीस नाईक माने यांच्या पथकाने केली.