धाराशिव: शहरात झालेल्या एका मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे २ लाख ५२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई शिवाजी चौक परिसरात करण्यात आली.
अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस पथक मालमत्ता विषयक गुन्ह्यांचा तपास करत होते. धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४६/२०२५, भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५ नुसार आरोपीचा शोध सुरू होता.
आयकर युनिट आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे, या गुन्ह्यात परसू लक्ष्मण चव्हाण (रा. जुना बस डेपो पाठीमागे, पारधी पिढी, धाराशिव) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तो शिवाजी चौकात असल्याची पक्की माहिती मिळताच, पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
सुरुवातीला चौकशीदरम्यान परसू चव्हाण याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्हा कबूल केला. हा गुन्हा आपण आपला चुलता दत्ता बाबु चव्हाण याच्यासोबत मिळून केल्याचे त्याने सांगितले. पैशांची गरज असल्याने, चोरीचे दागिने विकण्यासाठी आपण आलो होतो, असेही त्याने कबूल केले.
त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून २८ ग्रॅम वजनाचे (एकूण किंमत २,५२,००० रुपये) सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आरोपी परसू चव्हाण आणि जप्त केलेल्या मुद्देमालाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी धाराशिव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, आयकर युनिटचे सपोनि सुधीर कराळे, पोउपनि चंद्रकांत सावंत आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.