धाराशिव: शहरात घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस काढून त्याचा काळाबाजार करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात धाराशिव शहर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ६०,७७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक एस. एस. शेख यांना १६ जून २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली. धाराशिव शहरातील पाथरुड चौकाजवळील नाल्यालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम घरगुती सिलेंडरमधील गॅस बेकायदेशीरपणे वाहनांमध्ये भरून काळाबाजार करत होते.
माहितीची खातरजमा होताच, पोलीस निरीक्षक शेख यांनी तात्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधला. तेथील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार ए. पी. बाहेकर यांना सोबत घेऊन पोलिसांच्या पथकाने त्याच दिवशी सायंकाळी ७:३० वाजता छापा टाकला. घटनास्थळी शकील कासिमसाब तांबोळी आणि जावेद शकील तांबोळी (दोघे रा. सांजा वेस गल्ली, धाराशिव) हे रंगेहाथ सापडले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
- ११ भरलेले घरगुती गॅस सिलेंडर: एचपी कंपनीचे, अंदाजे किंमत ३३,७७० रुपये.
- १० रिकामे घरगुती गॅस सिलेंडर: एचपी कंपनीचे, अंदाजे किंमत २२,००० रुपये.
- १ इलेक्ट्रिक मोटार: गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी, अंदाजे किंमत ४,००० रुपये.
- १ इलेक्ट्रॉनिक वजन काटा: रिलायन्स वेट मास्टर कंपनीचा, अंदाजे किंमत १,००० रुपये.
या दोन्ही आरोपींविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक एस. एस. शेख, नायब तहसीलदार ए. पी. बाहेकर, सपोनि रवींद्र अंभोरे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय डिघोळे, श्रेणी पो. उपनिरीक्षक देविदास हावळे आणि पोलीस अंमलदार चक्रधर पाटील, हुसेन सय्यद, राशीद पठाण, पवन नागरगोजे, रिजवान बेग यांचा समावेश होता.