धाराशिव: जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धाराशिवमध्ये गांजा तस्करांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 16 लाख रुपये किमतीचा 81 किलो गांजा जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला अहमदनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील काही इसमांची टोळी गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. वाशी पोलीस ठाणे अंतर्गत मांडवा शिवार येथे राखाडी रंगाची स्विफ्ट डिझायर कारमधून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
पोलिसांनी तात्काळ छापा टाकला असता कारमध्ये चार प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये गांजा आढळून आला. यावेळी उपस्थित असलेल्या सहा जणांपैकी दोघांना अटक करण्यात आली तर चार जण पळून जाण्यात यशस्वी झाले.
अटक करण्यात आलेल्या आरोपी:
- प्रसाद उर्फ विकी भागवत पवार, वय 22 वर्षे, रा. साळेगाव, ता. केज, जि. बीड, हल्ली मुक्काम कळंब
- गंगाराम उर्फ शेषराव रावसाहेब पवार, वय 36 वर्षे, रा. सदाफुले वस्ती, जामखेड, जि. अहिल्यानगर
जप्त केलेला मुद्देमाल:
- 81.488 किलो गांजा, किंमत 16,29,760 रुपये
- गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार
- तीन मोटारसायकल
या कारवाईत एकूण 27,29,760 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांच्या मदतीने पंचनामा करण्यात आला. सपोनि कासार यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, फहरान पठाण, पोलीस अंमलदार योगेश कोळी, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे, नितीन भोसले तसेच पोलीस ठाणे वाशीचे पोलीस निरीक्षक थोरात, सपोनि सावंत व पथक यांनी केली.