धाराशिव: जिल्ह्यात अवैध मटका जुगाराविरोधात पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला असून, गुरुवारी एकाच दिवशी उमरगा, धाराशिव शहर आणि आनंदनगर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमरग्यात दोन ठिकाणी कारवाई
उमरगा पोलिसांनी गुरुवारी दुपारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मटका जुगार खेळवणाऱ्या दोघांना पकडले. पहिली कारवाई दुपारी ३.२० वाजता कसगी येथील बसवेश्वर चौकात करण्यात आली. संतोष गुरव यांच्या पत्राच्या शेडसमोर मोकळ्या जागेत माधुरी मटका जुगार चालवणाऱ्या सचिन प्रभाकर जमादार (वय २६, रा. कसगी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ६१० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
दुसरी कारवाई दुपारी २.४० वाजता डिग्गी रोडवरील महादेव रेस्टॉरंटच्या पाठीमागे करण्यात आली. येथे माधुरी मटका जुगाराचे आकडे घेताना राजेंद्र भिमराव जमादार (वय ७४, रा. शासकीय झोपडपट्टी, उमरगा) याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून ७२० रुपये रोख आणि साहित्य जप्त केले. दोन्ही आरोपींविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धाराशिव शहरातही जुगारावर छापा
धाराशिव शहर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास शहरातील नाझ हॉटेलच्या बाजूला असलेल्या पॅलेस पान स्टॉलच्या पाठीमागे छापा टाकला. या ठिकाणी कल्याण मटका जुगाराचे आकडे घेणाऱ्या हज्जुबाबा रसुल शेख (वय ५९, रा. आगड गल्ली, धाराशिव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ५६० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
आनंदनगर पोलिसांची बसस्थानकासमोर कारवाई
आनंदनगर पोलिसांनी सायंकाळी ५.२० वाजता बसस्थानकासमोरील उस्मान टी हाऊसजवळ मोकळ्या जागेत छापा मारला. यावेळी कल्याण मटका जुगार खेळवत असलेल्या जमीर हबीब तांबोळी (वय ३८, रा. आगड गल्ली, धाराशिव) याला पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून ७१० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोहीम उघडली असून, या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.






