धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी अवघ्या नऊ महिन्यांत झालेला बदल हा केवळ एका अधिकाऱ्याच्या बदलीचा विषय नाही, तर तो जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या परिस्थितीचा आणि प्रशासकीय निष्क्रियतेचा गंभीर आरसा आहे. मावळते पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच झालेली उचलबांगडी ही त्यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करणारीच म्हणावी लागेल. तुळजापूर आणि परंडा येथील ड्रग्ज प्रकरणांनी जिल्ह्याच्या प्रतिमेला जो काळिमा फासला, त्यातून पोलीस दलाची अकार्यक्षमता चव्हाट्यावर आली. वाढती गुन्हेगारी आणि फोफावलेले अवैध धंदे रोखण्यात आलेले सपशेल अपयश हे जाधव यांच्या बदलीमागचे प्रमुख कारण असल्याचे लपून राहिलेले नाही.
संजय जाधव यांनी १४ ऑगस्ट २०२४ रोजी पदभार स्वीकारला तेव्हा त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर होता. मात्र, ही आव्हाने पेलण्याऐवजी त्यांच्या काळात गुन्हेगारी अधिक बोकाळल्याचे चित्र निर्माण झाले. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील अनेक प्रमुख आरोपी आजही मोकाट आहेत, हे वास्तव पोलीस दलाच्या तपासावर आणि इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. केवळ नऊ महिन्यांत बदली होणे, हेच मुळात वरिष्ठ पातळीवरून त्यांच्या कामाबद्दलची नाराजी स्पष्ट करते.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, जाता जाता पोलीस कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबल यांच्या बदल्यांसाठी सुरू झालेला ‘अंतिम सामना’. या बदल्या नियमबाह्य आणि आर्थिक ‘देवाणघेवाणी’तून होत असल्याची जी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली, ती अत्यंत चिंताजनक आहे. ‘बदलीचा बाजार’ म्हणून ओळखला जाणारा हा प्रकार म्हणजे व्यवस्थेतील पोखरलेपणाचे दर्शन घडवतो. ‘धाराशिव लाइव्ह’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्याने त्याला तात्पुरता ब्रेक लागला असला, तरी या प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. पोलीस दलातील बदल्या जर अशा पद्धतीने होत असतील, तर तेथील शिस्त आणि प्रामाणिकपणा कसा टिकणार?
आता नूतन पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि मागील अनुभव पाहता त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सांगली आणि अकोल्यातील त्यांच्या कामाने त्यांना एक सक्षम अधिकारी म्हणून ओळख दिली आहे. आता धाराशिव पोलीस दलात अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर या महिला अधिकाऱ्यांच्या हाती सूत्रे आल्याने सकारात्मक बदलाची आशा आहे.
परंतु, केवळ नेतृत्वबदल पुरेसा नाही. श्रीमती खोकर यांच्यासमोर आव्हानांची मालिका आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार १८ आरोपींना दीड महिन्यानंतरही अटक का होत नाही? पोलीस त्यांना शोधत नाहीत की ‘चिरीमिरी’ घेऊन त्यांना मोकळे रान दिले जाते, या जनतेच्या मनातील शंकांना त्यांना कृतीतून उत्तर द्यावे लागेल. जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेले दारू, मटका, जुगार अड्डे आणि गुटख्याची विक्री तात्काळ थांबवावी लागेल. अनेक गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींना जेरबंद करणे, हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान आहे. परंडा ड्रग्ज प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्यावरील संशयाची सुई पाहता, त्यांची तातडीने उचलबांगडी करून निष्पक्ष चौकशी करणे, हे जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आवश्यक आहे.
नूतन पोलीस अधीक्षकांना सर्वप्रथम पोलीस दलातील अंतर्गत शुद्धीकरणावर भर द्यावा लागेल. ‘बदलीचा बाजार’ सारख्या चर्चा पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. तुळजापूर आणि परंडा ड्रग्जमुक्त करून, जिल्ह्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी त्यांना कठोर पावले उचलावी लागतील. केवळ श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद मिळतील, पण कायद्याचे राज्य स्थापित करण्यासाठी कणखर भूमिका आणि निःपक्षपाती कारवाईच करावी लागेल. धाराशिवची जनता खूप काही सहन करत आली आहे; आता त्यांना परिणामकारक आणि दृश्यमान बदल हवा आहे. श्रीमती खोकर या अपेक्षा पूर्ण करतील आणि जिल्ह्याला भयमुक्त, गुन्हेगारीमुक्त करतील, हीच माफक अपेक्षा! त्यांचे कार्य केवळ कागदोपत्री न राहता, प्रत्यक्ष जमिनीवर दिसावे, अन्यथा हा ‘खुर्चीबदला’चा खेळ असाच सुरू राहील आणि जनता मात्र भरडली जाईल.
- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह