तुळजापूर : येथील एका पोलीस अधिकाऱ्यावर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करण्यासाठी हेतुपुरस्सर तपासात दिरंगाई करून आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश के. नरवडे यांनी आरोपींना जामीन मिळवण्यासाठी मदत केली, असा दावा करणारा तक्रार अर्ज वसीम गफुर इनामदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे सादर केला आहे.
या तक्रारीनुसार, ९ जून २०२५ रोजी दाखल करण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे की, वसीम इनामदार यांचे चुलते सत्तार यासिन इनामदार यांच्या हत्येप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवडे यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, तपास अधिकारी नरवडे यांनी गुन्हा दाखल झाल्यापासूनच आरोपींना मदत करण्यास सुरुवात केली होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
लाचखोरी आणि तपासात असहकार्याचा आरोप
तक्रारदार वसीम इनामदार यांनी आरोप केला आहे की, तपास अधिकारी नरवडे यांनी त्यांच्याकडे २,००,००० रुपयांची मागणी केली होती. दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी हा खर्च लागेल, असे त्यांना सांगण्यात आले होते. तसेच, जेव्हा इनामदार यांनी भेटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अधिकाऱ्याने त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, नरवडे यांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही.
आरोपीला जामीन मिळण्यास मदत
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ २० ते २५ दिवसांतच आरोपींनी धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. जामिनाच्या सुनावणीवेळी तपास अधिकारी नरवडे यांनी जाणूनबुजून आपले म्हणणे सादर केले नाही, ज्यामुळे न्यायालयाने ‘नो से’ (No Say) आदेश दिला. वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे आरोपी गणेश अनिल घाटशिळे याला जामीन मंजूर झाला, असे तक्रारीत नमूद आहे. जर अधिकाऱ्यांनी वेळेवर दोषारोपपत्र दाखल केले असते, तर आरोपीला जामीन मिळाला नसता, असेही तक्रारीत म्हटले आहे.
निलंबन आणि चौकशीची मागणी
या प्रकरणात तपास अधिकारी नरवडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांची खात्यांतर्गत चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तसेच, नरवडे यांचे मागील तीन महिन्यांचे कॉल डिटेल्स, बँक स्टेटमेंट, पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन यांची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या तक्रारीची एक प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलीस महानिरीक्षक (छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र) आणि पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) यांनाही माहितीसाठी सादर करण्यात आली आहे.