धाराशिव : धाराशिव शहरातील रसुलपुरा भागात सुरू असलेल्या एका मोठ्या अवैध गोवंश कत्तलखान्याचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी सायंकाळी टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, कत्तलीसाठी आणलेली ५१ जिवंत गोवंशीय जनावरे आणि ४०५ किलो मांस जप्त केले आहे. या कारवाईत वाहनांसह एकूण ४३,६१,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गुप्त बातमीदारामार्फत रसुलपुरा येथील अलीम कुरेशी याच्या घराच्या कंपाऊंडमध्ये गोवंश कत्तल होत असल्याची तसेच वाहनांमधून मोठ्या प्रमाणात जनावरे आणल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने शनिवारी सायंकाळी ७:४० च्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.
घटनास्थळी पोलिसांना तीन जर्सी गायी बांधलेल्या दिसल्या, तर अलीम कुरेशी याच्या घराच्या कंपाऊंडमध्ये ४०५ किलो गोवंशाचे मांस आढळून आले. जवळच जनावरे कापण्यासाठी वापरण्यात येणारा एक लोखंडी सत्तुर, एक सुरी आणि एक लोखंडी आकडाही सापडला. पोलिसांनी घटनास्थळावरून मुख्य आरोपी अलीम मजिद कुरेशी (वय ३८, रा. रसुलपुरा, धाराशिव) याला ताब्यात घेतले.
तसेच, परिसरात उभ्या असलेल्या दोन आयशर टेम्पो आणि एका पिकअपची पाहणी केली असता त्यात कत्तलीसाठी आणलेली जनावरे आढळून आली.
- आयशर टेम्पो (क्र. एमएच ४५-०९२७): यामध्ये १३ जर्सी गायी आढळून आल्या. चालक मुज्जमिल शाकीर शेख (वय २०, रा. अकलूज, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली.
- पिकअप (क्र. एमएच १२ ईक्यू ३७७८): यामध्ये ४ जर्सी गायी आणि २५ वासरे होती. चालक इंद्रजित विश्वास पैठणकर (वय ३७, रा. मालेगाव, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले.
- आयशर टेम्पो (क्र. एमएच १२ एआर ९८२५): यामध्ये ८ गायी आणि एक कारवड अशी एकूण ९ जनावरे आढळून आली.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ५१ जिवंत जनावरे, ४०५ किलो मांस आणि गुन्ह्यासाठी वापरलेली तीन वाहने असा एकूण ४३,६१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दराडे आणि त्यांच्या पथकाने केली.