धाराशिव : जिल्ह्यातील अवैध धंदे आणि मटका व्यावसायिकांवर पोलिसांनी आपला फास आवळला आहे. सोमवारी (ता. १६) नळदुर्ग, तुळजापूर, धाराशिव शहर आणि शिराढोण या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी एकाच दिवशी धडक कारवाई करत कल्याण आणि मिलन नाईट मटक्याच्या अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवायांमध्ये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, एकूण सात जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
नळदुर्गमध्ये दोघांवर कारवाई:
नळदुर्ग पोलिसांनी सोमवारी सायंकाळी दोन ठिकाणी छापे टाकले. अंबाबाई कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे पिठाच्या गिरणीजवळ कल्याण मटका चालवताना मोईन गफार कुरेशी (वय ४३, रा. रहीमनगर, नळदुर्ग) याला ६४० रुपयांच्या मुद्देमालासह रंगेहात पकडण्यात आले. तर, अक्कलकोट रोडवरील उडुपी हॉटेलच्या बाजूला आडोशाला सतीश दयानंद स्वामी (वय ४०, रा. जळकोट, ता. तुळजापूर) याला ९६० रुपयांच्या मटका साहित्यासह ताब्यात घेण्यात आले. दोघांवरही नळदुर्ग पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
-
तुळजापूर शहरात दोन छापे:
तुळजापूर शहरातील नवीन बसस्थानकासमोरील टपरीच्या बाजूस औदुंबर देवपुरी पुरी (वय ६०, रा. तीर्थ बु., ता. तुळजापूर) याला १,३९० रुपयांच्या कल्याण मटक्याच्या साहित्यासह पकडण्यात आले. तसेच, जुने बसस्थानक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गावर सदाशिव गोविंद भातलवंडे (रा. बलसूर, ता. उमरगा, सध्या रा. तुळजापूर) याला २,७१० रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-
धाराशिव शहरात तरुणावर गुन्हा:
धाराशिव शहर पोलिसांनी सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास धारासुर मर्दिनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल स्वराज चहा सेंटरजवळ छापा टाकला. यावेळी मिलन नाईट मटका चालवणारा राहुल जालिंदर जाधव (वय ३३, रा. इंगळे गल्ली, धाराशिव) पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून ८५० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
शिराढोणमध्ये बीएसएनएल टॉवरशेजारी कारवाई:
शिराढोण पोलिसांनी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास गावातील बीएसएनएल टॉवरशेजारील मोकळ्या जागेत दोन छापे टाकले. यात परमेश्वर शंकर शहाणे (वय ४५) आणि यशवंत रावसाहेब शहाणे (वय ५२, दोघे रा. शिराढोण, ता. कळंब) हे मिलन नाईट मटका चालवत असल्याचे आढळून आले. या दोघांकडून प्रत्येकी २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यांच्यावर शिराढोण पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.







