धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात अवैध जुगार व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. आनंदनगर आणि भूम पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या कारवायांमध्ये पोलिसांनी हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
मिलन नाईट मटक्यावर कारवाई
बुधवारी, १३ ऑगस्ट रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास आनंदनगर पोलिसांनी लोकमंगल मल्टीस्टेट बँकेशेजारी छापा टाकला. यावेळी सुदर्शन जीवनराव कुलकर्णी (वय ५५, रा. भानुनगर, धाराशिव) हा इसम ‘मिलन नाईट मटका’ नावाचा जुगार खेळवत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने त्याच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य आणि ८०० रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी सुदर्शन कुलकर्णी याच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भूममध्ये चक्री मटक्याचा अड्डा उद्ध्वस्त, ४४,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
दुसऱ्या एका कारवाईत, भूम पोलिसांनी बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास नगरपरिषदेच्या रस्त्यालगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. बाडगे कलेक्शनच्या बाजूला असलेल्या या शेडमध्ये विकी उर्फ फकड्या गौतम जावळे (वय ३०, रा. कैकाडी गल्ली, भूम) हा ‘चक्री मटका’ जुगार चालवत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि तब्बल ४४,२०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. विकी जावळे विरोधात भूम पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या या जुगारविरोधी कारवायांमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.