धाराशिव – नागपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि रंगपंचमीच्या सणानिमित्त धाराशिव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी रूट मार्च काढला. शहर पोलिस स्टेशनपासून सुरू झालेला हा मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाप्त झाला.
या रूट मार्चचा मार्ग पोलिस स्टेशनपासून सुरू होऊन कलेक्टर बंगला, काळा मारुती चौक, माऊली चौक, आझाद चौक, विजय चौक, तालीम चौक, शम्स चौक, धाराशिव मर्दीनी कमान, देशपांडे स्टेडियम, पाथ्रुड चौक आणि ताज महाल टॉकीजमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत होता. शहराच्या प्रमुख भागांतून पोलिसांनी आपली उपस्थिती दर्शवत नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली.
नागपूरमधील अलीकडील घटनांमुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रूट मार्च आयोजित करण्यात आला.
या रूट मार्चमुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनीही शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.