धाराशिव: जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा सांभाळणाऱ्या पोलीस दलाच्या गाड्यांचे ‘स्टिअरिंग’ मात्र सध्या ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र समोर आले आहे. तब्बल १९ पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालयातील विविध विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिमतीला असलेल्या वाहनांवर मोटार परिवहन विभागातील प्रशिक्षित चालक नेमण्याऐवजी जनरल ड्युटीवरील पोलीस कर्मचारीच चालक म्हणून काम पाहत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पोलीस दलात चालकांची रीतसर भरती झालेली असून, त्यांना प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे, मात्र त्यांच्या नेमणुका कागदावरच राहिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच तुळजापूर रोडवर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीला अपघात झाला होता. अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम या अपघातातून थोडक्यात बचावल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी त्यांच्या गाडीवर कार्यरत असलेला चालक हा जनरल ड्युटीवरील पोलीस कर्मचारी होता. या घटनेनंतर, पोलीस वाहनांवर केवळ मोटार परिवहन विभागातील प्रशिक्षित चालकांचीच नेमणूक करावी, ही मागणी अधिक जोरकसपणे पुढे येऊ लागली आहे.
नव्या अधीक्षकांकडून अपेक्षा, जुन्यांनी साधला ‘हातसफाई’चा प्रयत्न?
मागील आठवड्यातच पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी रितू खोकर मॅडम यांनी पदभार स्वीकारला आहे. जाधव यांनी जाता-जाता पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून ‘हातसफाई’ करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती, मात्र ‘धाराशिव लाइव्ह’ने या वृत्ताला वाचा फोडल्याने त्याला चाप बसल्याचे बोलले जात आहे. आता नव्या पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम जेव्हा बदल्यांसंदर्भात निर्णय घेतील, तेव्हा तरी पोलीस वाहनांवर मोटार परिवहन विभागात भरती झालेल्या प्रशिक्षित चालकांनाच प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
एकीकडे गुन्हेगारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या आव्हानांना तोंड देताना पोलीस दलाला नेहमीच सतर्क राहावे लागते. अशा परिस्थितीत, पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. अप्रशिक्षित किंवा कमी अनुभव असलेल्या चालकांमुळे अपघाताचा धोका वाढतो, हे नुकत्याच घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, पोलीस दलातील वाहनांसाठी स्वतंत्र आणि प्रशिक्षित चालक असणे केवळ सोयीचे नाही, तर सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत गरजेचे आहे.
आता नव्या पोलीस अधीक्षक या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घेतील आणि पोलीस दलातील ‘स्टिअरिंग व्हील’ खऱ्या अर्थाने प्रशिक्षित हाती देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.