धाराशिव: जिल्हा पोलीस दलातील सर्वसाधारण बदल्या होऊनही, तब्बल १४ पोलीस अंमलदारांना अद्याप त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणाहून कार्यमुक्त (Relieve) करण्यात आले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार सूचना देऊनही या अंमलदारांना सोडण्यात न आल्याने, पोलीस अधीक्षक रितू खोखर (भा.पो.से.) यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बदली झालेल्या अंमलदारांना ‘तात्काळ’ कार्यमुक्त न केल्यास, संबंधित पोलीस ठाणे आणि शाखा प्रभारी अधिकाऱ्यांवर ‘शिस्तभंगाची कार्यवाही’ (Disciplinary Action) करण्यात येईल, असा सज्जड इशाराच त्यांनी दिला आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी एक ‘बिनतारी संदेश’ (Wireless Message) जारी केला आहे. हा संदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकाऱ्यांना उद्देशून आहे. “सर्वसाधारण प्रशासकीय/विनंती बदल्या -२०२५” मध्ये बदली झालेल्या अंमलदारांना कार्यमुक्त करण्याबाबत यापूर्वी वारंवार कळवण्यात आले होते, तरीही यादीमधील अंमलदारांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही, असे या संदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.
‘ही’ आहेत अंमलदारांना न सोडण्याची कारणे
कार्यमुक्त न केलेल्या १४ अंमलदारांची यादी आणि त्यांना कार्यमुक्त न करण्याची कारणे देखील समोर आली आहेत.
- पोलीस मुख्यालय (HQ): मुख्यालयातील तब्बल ८ अंमलदारांना ‘अपुरे मनुष्यबळ’ (Insufficient Manpower) असल्याचे कारण देत कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.
- स्थानिक गुन्हे शाखा (LCB): येथील दोन अंमलदारांना ‘हद्दपार प्रस्ताव’ आणि ‘एमपीडीए/मोका’ (MPDA/MCOCA) चे कामकाज प्रलंबित असल्याने थांबवण्यात आले आहे.
- धाराशिव शहर: येथील एका अंमलदाराला ‘गोपनीय काम’ आणि ‘अंमलदार कमी’ असल्याने कार्यमुक्त केलेले नाही.
- धाराशिव ग्रामीण: येथील अंमलदाराला ‘रामलिंग यात्रा बंदोबस्त’ असल्याचे कारण देण्यात आले आहे.
- तुळजापूर: तुळजापूर पोलीस ठाण्यातील एका अंमलदाराला ‘गुन्हे तपासावर प्रलंबित’ असल्याने सोडण्यात आलेले नाही.
प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा
प्रभारी अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी ही विविध कारणे आता पोलीस अधीक्षक कार्यालयाने ग्राह्य धरलेली दिसत नाहीत. पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी आपल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, “जे प्रभारी अधिकारी बदली झालेल्या पोलीस अंमलदार यांना कार्यमुक्त करणार नाही, त्यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.” या कडक भूमिकेमुळे आता संबंधित प्रभारी अधिकारी या १४ अंमलदारांना तात्काळ कार्यमुक्त करतात का, याकडे संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.
बदली होऊनही कार्यमुक्त न करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांची नावे आणि त्यांची कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- पोशि/1768 एस.एस. स्वामी (पोस्टे धाराशिव शहर): गोपनिय काम करतात / अंमलदार कमी असल्याने.
- पोह/1469 आर.जे.माचेवाड (पोस्टे धाराशिव ग्रामीण): रामलिंग यात्रा बंदोबस्त असल्या कारणाने.
- पोह/1326 व्ही.एम.माळी (पोस्टे तुळजापूर): गुन्हे तपासावर प्रलंबित असल्याने.
- सपोफौ/504 व्ही.एन. काझी (स्थागुशा, धाराशिव): 56, 57 हद्दपार प्रस्ताव प्रलंबित असल्याने.
- सपोफौ/218 डी.आर. जगदाळे (स्थागुशा, धाराशिव): एमपीडीए/मोका कामकाज प्रलंबित असल्याने.
- पोह/860 डी.जी. कंकाळ (पो.मु. धाराशिव): अपुरे मनुष्यबळ असल्याने.
- पोह/977 व्ही. के. घंटे (पो.मु. धाराशिव): अपुरे मनुष्यबळ असल्याने.
- पोशि/1269 व्ही.बी.राठोड (पो.मु. धाराशिव): अपुरे मनुष्यबळ असल्याने.
- सपोफौ/546 एस.यु.सय्यद (पो.मु. धाराशिव): अपुरे मनुष्यबळ असल्याने.
- पोह/1383 एम.बी.सुरवसे (पो.मु.धाराशिव): अपुरे मनुष्यबळ असल्याने.
- पोशि/1035 ए.व्ही.साळुंके (पो.मु. धाराशिव): अपुरे मनुष्यबळ असल्याने.
- पोशि/1116 जी.के.बिराजदार (पो.मु.धाराशिव): अपुरे मनुष्यबळ असल्याने.
- पोशि/56 एस.पी.कलवले (पो.मु. धाराशिव): अपुरे मनुष्यबळ असल्याने.
- पोह/1248 एम.एम. अरब (मोपवि, धाराशिव): (यादीमध्ये कोणतेही कारण नमूद केलेले नाही).





