धाराशिव: “कभी खुशी कभी गम…” असा काहीसा फिल्मी माहोल सध्या धाराशिव पोलीस दलात अनुभवायला मिळतोय. निमित्त ठरलंय ते म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांना अचानक लागलेला ‘ब्रेक’! कुणाच्या पोटात आनंदाचे उमाळे, तर कुणाच्या काळजात धस्स झालंय, पण ‘धाराशिव लाइव्ह’ने दिलेल्या दणक्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूत्रं हालवत या ‘ट्रान्सफर एक्सप्रेस’ला रेड सिग्नल दाखवला आहे.
काय होता हा ‘अंतिम सामना’?
जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संजय जाधव साहेबांची अवघ्या नऊ महिन्यांत तडकाफडकी बदली झाली. त्यांच्या जागी सांगलीच्या दबंग रितू खोपर मॅडम येणार हेही ठरलं. पण मॅडम रुजू व्हायच्या आतच जाधव साहेबांनी ‘जाता जाता हात साफ करण्याचा’ जणू चंग बांधला होता. परंडा आणि तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणं, वाढती गुन्हेगारी आणि फोफावलेल्या अवैध धंद्यांमुळे जाधव साहेबांची कारकीर्द ‘निष्क्रिय’ ठरल्याची चर्चा आधीच पोलीस वर्तुळात आणि जनतेतही चांगलीच रंगली होती. जणू काही, गुन्हेगारी रोखण्याऐवजी त्याला ‘सपोर्ट’ देण्याचीच ‘सुपारी’ त्यांनी घेतली होती की काय, असा विनोदी सूरही उमटत होता.
याच ‘निष्क्रिय’ इनिंगचा शेवट गोड करण्याच्या नादात, साहेबांनी रखडलेल्या पोलीस कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलच्या बदल्यांचा ‘शुभमुहूर्त’ साधला. गेल्या दोन दिवसांपासून रोज ५० पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात बोलावून ‘तीन पाकी एक चॉईस’ (म्हणजे पसंतीची तीन ठिकाणं सांगा, आम्ही एक देतो!) अशी ‘ऑफर’ दिली जात होती. पण ही ‘ऑफर’ नियमांच्या चौकटीत बसणारी नव्हती, तर त्याला ‘अर्थ’पूर्ण ‘देवाणघेवाणी’चा वास येत असल्याची कुजबुज पोलीस दलातच सुरू झाली. जणू काही ‘जादूमंतर’ करून क्रीम पोस्टिंग पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावण्यात आली होती.
धाराशिव लाइव्हचं ‘स्टिंग ऑपरेशन’
हा ‘बदलीचा बाजार’ आणि ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांची भणक ‘धाराशिव लाइव्ह’ला लागताच, त्यांनी याबाबत सडेतोड बातमी प्रसिद्ध केली. या बातमीने पोलीस दलात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडवली. वरिष्ठांनी तात्काळ याची दखल घेत, या बदल्यांना स्थगिती दिली. यामुळे ज्यांनी ‘फिल्डिंग’ लावली होती, त्यांच्या आनंदावर विरजण पडलं, तर ज्यांना डावललं जाण्याची भीती होती, त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. म्हणूनच पोलीस दलात ‘कभी खुशी, कभी गम’चं वातावरण तयार झालं.
नव्या ‘कप्तान’ची एन्ट्री आणि खेळाला पूर्णविराम?
दरम्यान, नव्या पोलीस अधीक्षक रितू खोपर मॅडम शनिवारी धाराशिवमध्ये रुजू झाल्या आणि या ‘बदलीच्या सामन्या’वर तूर्त तरी पडदा पडला आहे. त्यांच्या येण्याने पोलीस दलात एक नवी उमेद जागी झाली असून, कारभारात पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पण काही प्रश्न अनुत्तरितच!
‘धाराशिव लाइव्ह’ने या प्रकरणी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे:
१. मार्च-एप्रिल अखेरीस पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे अपेक्षित असताना, त्या इतके दिवस का रखडल्या? या विलंबामागे कोणाचा ‘अर्थ’पूर्ण हात होता?
२. अनेक पोलीस कर्मचारी एकाच ठिकाणी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसले आहेत, त्यांच्या बदल्या का केल्या नाहीत? त्यांना कोणाचा वरदहस्त होता?
३. ज्यांनी क्रीम पोस्टिंगसाठी (उदा. एलसीबी) ‘जादा वजन’ ठेवल्याची चर्चा आहे, त्या ‘वजनदार’ अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार का?
या प्रश्नांची उत्तरे नव्या पोलीस अधीक्षक देतील आणि धाराशिव पोलीस दलाला शिस्त लावतील, अशी अपेक्षा सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. तोपर्यंत, या ‘बदली नाट्या’चे पुढील अंक कसे उलगडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!
संबंधित बातम्या