धाराशिव : जालना येथे नुकत्याच पार पडलेल्या २० व्या छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात धाराशिव जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले आहे. या संघाने एकूण ७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्य पदकांची कमाई करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांचे व्यावसायिक कौशल्य, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवून ती तपासण्याच्या उद्देशाने दरवर्षी पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते. या वर्षी हा मेळावा दिनांक १ जुलै ते ४ जुलै २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. विरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली जालना येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील ३ अधिकारी आणि १९ अंमलदारांच्या संघाने भाग घेतला होता. संघाने विविध स्पर्धा प्रकारांमध्ये आपले कौशल्य दाखवत उल्लेखनीय यश मिळवले.
पदक विजेते अधिकारी व अंमलदार:
- सुवर्ण पदक:
- पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड (वैज्ञानिक सायन्सची तपासात मदत)
- सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज देवकर (गुन्हे तपासात लेबलिंग, पॅकिंग)
- पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बनसोडे (गुन्हे तपासात लेबलिंग, पॅकिंग व फिंगर प्रिंट)
- पोलीस निरीक्षक रविंद्र देवकर (शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास तोंडी चाचणी)
- पोलीस हवालदार दिपक जाधव (पोलीस फोटोग्राफी/व्हिडीओग्राफी)
- रजत पदक (रौप्य पदक):
- सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज देवकर (वैज्ञानिक सायन्सची तपासात मदत)
- पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बनसोडे (गुन्हे तपासात फोटोग्राफी टेस्ट)
- पोलीस नाईक लहु पाटील (शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास)
- पोलीस अंमलदार ए. ए. तिळगुळे (संगणक कौशल्य क्षमता लेखी परीक्षा)
- ए. एस. मोरे व एम. एम. काझी (संगणक कौशल्य चाचणी)
- पोलीस हवालदार डी. बी. काळबंडे (घातपात विरोधी तपासणी चाचणी)
- कांस्य पदक:
- पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बनसोडे (वैज्ञानिक सायन्सची तपासात मदत)
- सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज देवकर (गुन्हे तपासात फोटोग्राफी टेस्ट, फौजदारी कायद्याचे कलम व न्यायालयीन निर्णय, शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास तोंडी चाचणी)
- महिला पोलीस अंमलदार आर. ए. शेख (घातपात विरोधी तपासणी चाचणी)
या शानदार यशानंतर, आज दिनांक ८ जुलै २०२३ रोजी धाराशिव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात विजेत्या अधिकारी आणि अंमलदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या हस्ते विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
ही उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा पोलीस संघाने केली आहे. या सत्कार समारंभावेळी पोलीस निरीक्षक श्री. इज्जपवार यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.