धाराशिव : धाराशिवच्या राजकीय मैदानात पुन्हा एकदा आरोप – प्रत्यारोपाची मालिका सुरु झाली आहे! भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सिंदफळ येथे शेतकऱ्यांना कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाबद्दल माहिती द्यायला बोलावलं होतं, पण हे ऐकताच काँग्रेसच्या धीरज पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हृदयात ठिणगी पडली!
राणा पाटील यांनी ही योजना आत्ता पूर्ण झालीय असं समजून शेतकऱ्यांना पेढे वाटले असावेत, असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटलं आणि धीरज पाटील धाडकन कार्यक्रमस्थळी पोहोचले. राणा पाटील यांना धारेवर घेत धीरज पाटील यांनी तिथे ‘राडा’ केला. यावेळी राणा पाटलांनी धीरज पाटलांचा अवतार बघून चावणारा कुत्रा म्हणताच, धीरज पाटील यांनी कुत्र्याच्या राजकिय जातीचं वर्गीकरण करताना राणांना ‘डॉबरमॅन’ म्हणून ओळख पटवली.
या राजकीय तमाशात शिवसेना ( उद्धव ठाकरे ) चे खासदार ओमराजे निंबाळकर सुद्धा सामील झाले! अपुऱ्या कामाचे श्रेय घेण्याचे राणा पाटील यांना सवय आहे. तुळजापूरच्या जनतेला ते कुत्रा म्हणाले. राणा पाटील आणि त्यांचे वडील पद्मसिंह पाटील यांनी या जिल्हयाला नेहमी विकासापासून वंचीत ठेवले . धाराशिव – तुळजापूर रेल्वे मार्गाच्या भू संपादनामध्ये शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली , त्यांनी काहीही कामे केली नाहीत म्हणून महिला मतदारांना साडी वाटण्याची वेळ आली आहे. पण तुळजापूरची जनता हुशार आहे, त्यांना निवडणुकीत धडा शिकवेल, असे बरेच काही बोलून गेले.
राणा पाटलांनी नेहमीच्या पद्धतीने उत्तर दिलं – “चावणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नसतं, मी माझं काम करतो.” आता विधानसभा निवडणुकीत धाराशिवची जनता ह्या ‘कुत्रीपणा’च्या नाटकात कोणाला काय ‘हड्डी’ देणार हे पाहणं रंजक ठरेल!