धाराशिव: आगामी धाराशिव नगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजू लागताच, शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सुरु झालेला ‘सामना’ आता ‘तुमच्याकडे आमची क्लिप, तर आमच्याकडे तुमची क्लिप’ अशा धमक्यांपर्यंत पोहोचला असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय ‘धुरळा’ अधिकच दाट झाला आहे. भाजप आमदार राणा पाटील आणि ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील हा वाद म्हणजे मनोरंजन, राजकारण आणि ‘रील’बाजीचा तडका ठरला आहे.
पार्श्वभूमी: एका शिस्तप्रिय स्पर्धेची ‘बेशिस्त’ कहाणी!
सगळ्याची सुरुवात झाली ती गणेश विसर्जन मिरवणुकीतून. काळ्या मारुती चौकात, जणू काही राजकीय ‘डान्स फ्लोअर’ सज्ज केल्याप्रमाणे, भाजप आणि ठाकरे सेनेने आपले मंडप एकमेकांसमोर थाटले होते. विशेष म्हणजे, दोन्ही पक्षांनी ‘शिस्तप्रिय’ मिरवणुकीसाठी बक्षीसही जाहीर केले होते. पण म्हणतात ना, राजकारणात शिस्त ती कसली! भाजप कार्यकर्त्यांनी ‘शिस्त’ शब्दाला सुट्टी देत, खासदार ओमराजे निंबाळकर मंडपात येताच आमदार राणा पाटलांचे चिरंजीव मल्हार पाटील आणि शहराध्यक्ष अमित शिंदे यांनी दंड थोपटायला सुरुवात केली.
एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ‘ढोलकीला बांधून बदा बदा बडवीन’ अशा प्रेमळ (?) गीताच्या बोलांवर ठेका धरत त्यांनी खासदारांना डिवचणारा एक ‘रील’ बनवला. या संपूर्ण प्रकारावर खासदार ओमराजे यांनी केवळ एक ‘गूढ’ स्मितहास्य देत दुर्लक्ष केले. मात्र, या ‘रील’मुळे भाजपची सोशल मीडियावर चांगलीच ‘नाचक्की’ झाली.
“असे शिस्तप्रिय कार्यक्रम होतच राहणार!” – आ. राणा पाटलांचा टोमणा
एखादा विषय संपतोय असे वाटत असतानाच, रविवारी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात आमदार राणा पाटलांनी या वादात तेल ओतले. चिरंजीवाच्या कृत्याचे अप्रत्यक्ष समर्थन करत ते म्हणाले, “असे शिस्तप्रिय कार्यक्रम पुढेही चालू राहतील.” या विधानामुळे वादाची आग पुन्हा भडकली.
“जनता यांचा माज उतरवेल!” – खा. ओमराजेंचा पलटवार
अखेर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी खासदार ओमराजेंचा संयम सुटला. पत्रकारांशी बोलताना ते संतापून म्हणाले, “राणा पाटील,अर्चना पाटील , पद्मसिंह पाटील यांना धाराशिवच्या जनतेने अनेकवेळा पराभूत केले, तरी यांचा माज उतरलेला नाही. मल्हार पाटलांवर काय संस्कार आहेत, हे जनतेने पाहिले आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता यांचा माज पुन्हा उतरवेल!”
‘क्लिप’ बॉम्ब: “वेळ आल्यावर व्हायरल करू”
खासदारांच्या या थेट हल्ल्यानंतर भाजप शहराध्यक्ष अमित शिंदे यांनी आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्र बाहेर काढले. “आमच्याकडेही खासदार ओमराजे निंबाळकर यांचे व्हिडिओ आहेत, योग्य वेळी ते व्हायरल करू,” अशी अप्रत्यक्ष धमकीच त्यांनी दिली.
यावर कडी करत ठाकरे सेनेने तर थेट ‘गुगली’च टाकली. “अमित शिंदेंकडे त्यांच्याच एका सहकाऱ्याची एक व्हिडीओ क्लिप आहे. दहा वर्षे झाली ती व्हायरल करत नाहीत , आता तरी ती क्लिप व्हायरल करावी,” असा टोला लगावत ठाकरे सेनेने भाजपलाच अडचणीत आणले आहे.
एकंदरीत, ‘रील’ पासून सुरु झालेला हा वाद आता ‘व्हिडिओ क्लिप’च्या धमक्यांपर्यंत पोहोचला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मतांच्या बेरजेसाठी हा सगळा ‘धुरळा’ उडवला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता पुढे नक्की कोणाची क्लिप बाहेर येणार आणि निवडणुकीच्या तोंडावर हा ‘धिंगाणा’ अजून किती रंगत जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.