पक्या: ( छाती फुगवून) आरं, ऐका रं आता कान देऊन! यंदा जिल्हा परिषदेवर आपल्याच घरातला माणूस बसणार. अध्यक्षपद बाईमाणसासाठी हाय, मंग आपली सखू काय कमी हाय व्हय? म्या बैठका घेतल्या, सतरंज्या उचलल्या, पोस्टर लावले… आता वहिनीसाहेब, ताईसाहेब कशाला? अध्यक्ष होणार तर आपली सखू!
भावड्या: (पक्याच्या चहाच्या कपाकडे बघत) काय रं पक्या, येड लागलंय का काय? तुझी सखू? अरे, मी अजित दादांसाठी जीवाचं रान केलंय. साहेबांचा गट बदलला तवा मी पयल्यांदा गुलाल फासला. त्याचा मोबदला नको व्हय? अध्यक्षपद आमच्याच गटाकडं हाय अन् उमेदवार आपली हौसा! विषयच नाय!
पेंद्या: (तोंडातला मावा थुंकत) च्यायला! तुमी दोघं बी कायबी बोलायला लागलाय रं! आरं, सावंत साहेबास्नी कोण भेटतंय रोज? मी! तालुक्याला कोण खेटे घालतोय? मी! मंग माझ्या घरात पद यायला नको का? माझी गंगी लय हुशार हाय. तीच होणार अध्यक्ष! कालच तिला सांगितलंय, “गंगे, आतापासूनच भाषणाची तयारी कर!”
पक्या: अरे, पण तुझ्या गंगीला चार माणसांत बोलता येतंय व्हय? माझी सखू बघ, बचत गटाची अध्यक्ष हाय. तिला हिशोब कळतोय, राजकारण कळतंय. राणा पाटलास्नी सांगणार हाय मी, “साहेब, घरात कशाला? कार्यकर्त्याच्या घरात बघा की!”
भावड्या: गप रं! तुझी सखू बचत गट बघतीया, आमची हौसा अख्खं घर बघतीया! घर चालवणारी जिल्हा परिषद चालवू शकत नाय व्हय? मोटे साहेबास्नी म्याच सांगितलंय, “भाऊ, बाहेरचं कुणी नको, घरातल्या घरात बघा की… म्हणजे, आमच्या घरात!”
पेंद्या: आरं भावड्या, तुझं घर किती? चार माणसांचं! जिल्ह्याचं राजकारण वेगळं असतंय! माझी गंगी बघ, तिचा स्वभाव लय कडक हाय. सगळ्यास्नी सरळ करील ती. धनंजय भाऊंना सांगून तिचा अर्ज पक्काच करून आणतो बघा!
पक्या: (रागाने उठत) मंग ठरलंच तर! मी बी आजच माझ्या सखूचे फोटो काढतो अन् सोशल मीडियावर टाकतो, ‘भावी अध्यक्षा!’
भावड्या: (त्याच्यापेक्षा जोरात) मी तर हौसाच्या नावाने गावात बॅनरच लावतो! बघूच कोण आडवा येतोय!
पेंद्या: मी काय बॅनर-बिनर लावत नाय, थेट गुलालच उधळतो! ‘अध्यक्ष झाल्याबद्दल गंगीताईंचे हार्दिक अभिनंदन!’
(तिघेही एकमेकांच्या अंगावर जायला लागतात. तेवढ्यात सरपंच तिथं येतात.)
सरपंच: (हसून) काय रं मर्दांनो! अजून निवडणुकीचा पत्ता नाही, आरक्षणाचं खरं-खोटं कळायचंय… अन् तुमी तिघं एकमेकांच्या बायकांना खुर्चीवर बसवायला निघालाय! अरे, आधी घरातली भांडी आवरलीत का बघा… मंग जिल्ह्याचं राजकारण करा! चला, उठा आपापल्या घरी!
(सरपंचाचं बोलणं ऐकून तिघेही माना खाली घालतात आणि हळूच तिथून सटकतात.)