धाराशिव: गेले सहा महिने राजकीय इगोच्या धुळीत हरवलेला आणि कुरघोडीच्या खड्ड्यात अडकलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा गाडा अखेर हलायला लागला आहे. ज्या दोन पैलवानांमध्ये (आमदार राणा पाटील आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक) विकासाची कुस्ती रंगली होती, त्यांनी आता ‘हात मिळवणी’ केल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत धाराशिवकरांना खड्डेमुक्त रस्त्यांचे ‘गिफ्ट’ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, पण थांबा! पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!
फ्लॅशबॅक: ‘एक घाव, दोन तुकडे’ स्टाईल राजकारण!
सहा महिन्यापूर्वी, भाजपचे आमदार राणा पाटील यांनी थेट अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना साकडे घालून जिल्हा नियोजन समितीच्या २६८ कोटींच्या निधीला ‘ब्रेक’ लावला. जणू काही “थांबा, मी सांगितल्याशिवाय एक पैसाही हलता कामा नये!” असाच त्यांचा अविर्भाव होता.
याचा ‘बदला’ म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनीही “तुम्ही आमचा निधी थांबवता काय? मग आम्ही तुमच्या शहराचे रस्तेच होऊ देत नाही!” म्हणत शहरातील रस्त्यांचे १४० कोटींचे टेंडरच रद्द करून टाकले. या राजकीय ‘तू तू-मैं मैं’ मध्ये बिचाऱ्या धाराशिवकरांना मात्र धुळीत आणि खड्ड्यातच प्रवास करावा लागला.
अखेर ‘ज्ञानप्राप्ती’ झाली!
आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर पालकमंत्री महोदयांना अचानक साक्षात्कार झाला. पत्रकारांनी विचारताच त्यांनी बॉम्ब फोडला की, रस्त्यांची फेरनिविदा काढणार आणि दिवाळीनंतर लगेच कामाला सुरुवात! अहो आश्चर्यम्! इतकेच नाही, तर आमदार राणा पाटलांचा जो ‘संभ्रम’ होता, तो आता दूर झाल्याने २६८ कोटींच्या निधीवरील स्थगितीही उठणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. जणू काही सहा महिन्यांपासून सुरू असलेला हा गोंधळ म्हणजे निव्वळ एक ‘गैरसमज’ होता!
ठाकरे गटाचा टोला: “संभ्रम नव्हे, वाटाघाटी ठरल्या!”
पालकमंत्र्यांनी जरी याला ‘संभ्रम’ म्हटले असले, तरी शिवसेना (ठाकरे गट) मात्र याला ‘वाटाघाटी’ यशस्वी झाल्याचे म्हणत आहे. “हा संभ्रम नव्हता, तर कुणाला किती ‘वाटा’ मिळणार, याचा मामला होता. आता हिशोब जुळल्यामुळे सगळं आलबेल झालंय,” असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
पुढचा अंक: निवडणूक आणि ‘आचारसंहिता’ नावाचा स्पीडब्रेकर!
आता गंमत पुढेच आहे. लवकरच जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे एकीकडे नेतेमंडळी विकासाची ‘लॉलीपॉप’ दाखवत असताना, दुसरीकडे ‘आचारसंहिता’ नावाचा मोठा स्पीडब्रेकर तयार आहे. त्यामुळे, दिवाळीनंतर खरोखरच रस्त्याचे काम सुरू होणार की फक्त नारळ फुटणार आणि काम पुन्हा एकदा लाल फितीत अडकणार, हा खरा प्रश्न आहे.
तोपर्यंत धाराशिवकरांनो, हेल्मेट वापरा, गाडी सांभाळून चालवा आणि राजकीय धुळीपासून आपल्या आरोग्याची काळजी घ्या!