धाराशिव संस्थानाच्या नकाशावर एक छोटेसे टिंब असले, तरी राजकारणाच्या पटावर ते मोठा बुद्धिबळ होता. आणि या बुद्धिबळाचा राजा होता, ‘पावशेरसिंह’! नाव जरी सिंह असले तरी वजनात आणि कर्तृत्वात पावशेरच! पण आव असा आणायचा की जणू अख्ख्या जंगलाचा राजा तोच. त्याचा एकच धंदा होता – भोळ्या जनतेला ‘विकासाचा वायफाय’ दाखवायचा. वायफाय दिसायचा, रेंज फुल्ल दाखवायची, पण पासवर्ड आजपर्यंत कुणालाच लागला नाही. कारण तो पासवर्ड स्वतः पावशेरसिंहच विसरले होते. या वायफायच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून करोडोंचे केबल काढायचे आणि ते थेट पुणे-मुंबईतल्या आपल्या गुप्त संस्थानांना जोडायचे, हा त्यांचा हातखंडा होता.
वरून दिसायला अगदी शांत, सभ्य, जणू तुळशीत लावलेले रोपटे. पण आतून कट-कारस्थानांचे असे काही जाळे विणायचे की कोळ्याला सुद्धा लाज वाटावी.
बोरूबहाद्दरचा ‘सत्याचा तोफखाना’
पण प्रत्येक राजाला एक वैताग देणारा विदूषक असतोच. इथे विदूषक नव्हता, तर एक पत्रकार होता – बोरूबहाद्दर! नावाप्रमाणेच त्याचा बोरू (पेन) म्हणजे जणू काही तोफखाना होता. त्याच्या बोरूत शाई नव्हती, तर सत्य ओतले होते. एके दिवशी बोरूबहाद्दरने आपल्या वृत्तपत्रातून ‘पावशेरसिंहाचा विकासाचा वायफाय: रेंज जनतेला, डेटा मात्र स्वतःला’ या मथळ्याखाली असा काही लेख छापला की धाराशिवच्या राजकारणात ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. पावशेरसिंहाचे पुणे-मुंबईतले ‘संस्थान’ कसे फोफावले, याचे धागेदोरे पुराव्यासकट जनतेसमोर ठेवले.
हा लेख वाचून पावशेरसिंह चांगलाच भेदरला. चेहऱ्यावरचा शांततेचा मुखवटा गळून पडला आणि आतला ‘पावशेर’ अस्वस्थ होऊन पिंजऱ्यातल्या उंदरासारखा इकडून तिकडे फेऱ्या मारू लागला.
वाघाची डरकाळी आणि कंदिलाचा प्रकाश
पावशेरसिंहाच्या डोकेदुखीला अजून एक कारण होते – त्याचाच चुलत भाऊ ‘सूर्यराजे’. लोक त्यांना आदराने ‘वाघ’ म्हणायचे. सूर्यराजे अधूनमधून जाहीर सभांच्या डरकाळ्या फोडायचे आणि त्या आवाजाने पावशेरसिंहाच्या सिंहासनाचे स्क्रू ढिले व्हायचे. पावशेरसिंहाला पक्की खात्री पटली की, हा बोरूबहाद्दर नक्कीच सूर्यराजे वाघाला सामील झाला आहे. माझ्या वायफायचा पासवर्ड याच वाघाने बोरूबहाद्दरला दिला असणार!
आता यावर काहीतरी उपाय करायला हवा. पावशेरसिंहाने आपला दरबार भरवला. दरबारात अनेक भाट होते, जे राजाच्या शिंकेला सुद्धा ‘क्या बात है महाराज!’ म्हणायचे. पण त्यात एक ‘स्पेशल’ जागा होती कवी कंदीलकर यांची. कंदीलकर स्वतःला विचारवंत, लेखक, कवी, पत्रकार, आणि वेळ पडल्यास वैज्ञानिक सुद्धा समजायचे. ते राज्यघटना आणि स्वातंत्र्यावर अशी काही भाषणे ठोकायचे की ऐकणाऱ्याला वाटावे, यांनीच कुठेतरी बसून संविधान लिहिले आहे. पण गंमत म्हणजे, हा स्वातंत्र्याचा पुजारी स्वतः मात्र पावशेरसिंहाच्या दरबारात कौतुकाच्या दोन शब्दांवर गुलामगिरीत जगत होता. पूर्वी शिक्षणसम्राट भोसले यांच्याकडे कवडीमोल पगारावर काम करणारा हा कंदील, पावशेरसिंहाने नोटांचे बंडल टाकताच त्यांच्या दरबारातील सर्वात तेजस्वी कंदील बनून चमकू लागला होता.
‘बदनामी’ नावाचे बुमरँग
पावशेरसिंहाने आपली समस्या कंदीलकरांपुढे मांडली. कंदीलकरांनी आपल्या डोक्यातला, सॉरी, भाड्याने घेतलेला विचारवंत जागा केला आणि एक भन्नाट युक्ती सांगितली, “महाराज, चिंता नसावी. तो बोरूबहाद्दर एकटा आहे. आपण त्यालाच बदनाम करू. त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू. जनतेच्या मनात त्याच्याविषयी किळस निर्माण करू.”
पावशेरसिंहाला आयडिया आवडली. दरबारातील इतर चमच्यांनी कंदीलकरांच्या नावाने जयघोष केला. मग काय, योजना कामाला लागली. सोशल मीडियावर खोटे-नाटे मेसेज फिरू लागले. बोरूबहाद्दर कसा खंडणीखोर आहे, कसा ब्लॅकमेलर आहे, याच्या सुरस कथा रचल्या गेल्या. पावशेरसिंहाच्या चमच्यांनी मिळेल त्या व्यासपीठावरून बोरूबहाद्दरवर चिखलफेक सुरू केली.
पण घडले उलटेच!
जनता दूधखुळी नव्हती. त्यांना खरा चोर कोण आणि चौकीदार कोण, हे चांगलेच कळत होते. बोरूबहाद्दरच्या बाजूने इतर पत्रकार संघटना उभ्या राहिल्या. सामान्य माणसांनी सोशल मीडियावरच पावशेरसिंहाच्या कंपूची धुलाई सुरू केली. हा बदनामीचा बाण ‘रिटर्न टू सेंडर’च्या स्पीडने परत आला आणि थेट पावशेरसिंहाच्याच सिंहासनाला लागला. ज्याला एकटं पाडायचं होतं, त्याच्यामागे अख्खा जनसागर उभा राहिला.
पावशेरसिंहाच्या राजवाड्यात आता स्मशानशांतता पसरली होती. कंदीलकरांचा चेहरा मेणबत्ती विझल्यावर जसा काळा होतो, तसा झाला होता.
आता पुढे काय? पावशेरसिंहाच्या भात्यात अजून कोणते विषारी बाण होते? की बोरूबहाद्दरच्या सत्याच्या फवाऱ्यापुढे त्यांनाही गंज चढावा लागणार होता?
…हे पाहूया पुढच्या भागात.






