बोरूबहाद्दरला कायद्याच्या जाळ्यात अडकवण्याचा पावशेरसिंहाचा डाव फसला होता. सर्व पत्रकार बोरूबहाद्दरला सपोर्ट केल्यामुळे कवी कंदीलकर यांनी सांगितलेल्या सर्व भंपक कथा खोट्या ठरल्या होत्या. पत्रकारांच्या नजरेत पावशेरसिंह खलनायक दिसू लागले होते.आता या डॅमेज कंट्रोलसाठी एकच उपाय होता – विषय बदलणे! आणि विषय बदलण्यासाठी त्यांच्या भात्यात एकच जुनं पण हुकमी अस्त्र होतं – ‘विकासाचा वायफाय’. निवडणुका जवळ आल्या की या वायफायचा स्पीड अचानक 5G होतो. सगळीकडे विकासाची रेंज दिसायला लागते, पण जनतेला पासवर्ड काही मिळत नाही. कारण सगळा डेटा तर पावशेरसिंहाच्या तिजोरीत जमा होत असतो.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झाली होती. इंद्र राजाचा आदेश होता, “जिंकायचंच!” त्यामुळे पावशेरसिंहाने ‘विकासाचा वायफाय २.०’ लॉन्च केला. सोशल मीडियावर घोषणांचा पाऊस पडू लागला.
‘मिनी माथेरान’ ते ‘जंगल सफारी’ – विसरभोळ्या घोषणा
जनतेला वेड्यात काढण्याची पावशेरसिंहांना जणू कलाच अवगत होती. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणांचा धुरळा उडवून दिला.
“येडशीच्या अभयारण्यात आपण ‘मिनी माथेरान’ बनवणार होतो, आठवतंय?” (पत्रकार एकमेकांकडे बघू लागले, कारण ते स्वतःच ही घोषणा विसरले होते). “ते काम तर होणारच आहे, पण आता त्यापुढे जाऊन आपण तिथे १५ किलोमीटरचा जंगल सफारी ट्रॅक बनवणार आहोत! डिसेंबर अखेर काम सुरू होईल!”
एका पत्रकाराने हळूच विचारले, “साहेब, पण ती जमीन तर वन विभाग आणि रेल्वेची आहे, मंजुरी मिळाली का?”
यावर पावशेरसिंह असे काही हसले, जणू मंजुरी म्हणजे काय हेच त्यांना माहीत नव्हते. “अहो, विकासाच्या एक्सप्रेसला मंजुरीचं सिग्नल लागत नाही. आपण आधी ट्रॅक टाकू, मग सरकार आपोआप हिरवा झेंडा दाखवेल.”
पण आता जनता हुशार झाली होती. पावशेरसिंहाच्या प्रत्येक घोषणेचे, प्रत्येक फेसबुक पोस्टचे स्क्रीनशॉट काढून व्हायरल केले जाऊ लागले. त्यांच्या विसरभोळेपणाचा ‘डिजिटल पुरावा’ तयार होऊ लागला होता.
सिंगापूरचे प्राणी आणि कंदीलकरांचे सांगाडे
सर्वात मोठी आणि भन्नाट घोषणा तर अजून बाकी होती. पावशेरसिंहाने आपला ब्रह्मास्त्र बाहेर काढला.
“धाराशिवच्या जनतेसाठी माझी सर्वात मोठी भेट! आपण तुळजापूरजवळ एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय उभारणार आहोत!” टाळ्यांचा कडकडाट झाला.
“या प्राणी संग्रहालयात तुम्हाला वाघ, सिंह, हत्ती, जिराफ, उंट… सगळे प्राणी दिसतील!”
गर्दीतून एका धाडसी पत्रकाराने पुन्हा प्रश्न विचारला (हा नक्कीच बोरूबहाद्दरचा चेला असणार, असे पावशेरसिंह मनात म्हणाले). “साहेब, हे सगळे प्राणी तुम्ही आणणार कुठून?”
हा प्रश्न ऐकून क्षणभर शांतता पसरली. पण पावशेरसिंह कसलेले राजकारणी होते. त्यांनी क्षणाचाही विचार न करता उत्तर फेकले, “अरे व्वा! काय प्रश्न विचारलात! आपण भारतात शोधू, नाहीच मिळाले तर थेट सिंगापूरहून आयात करू!”
पत्रकारांच्या तोंडावरचा ‘आ’ बंद व्हायच्या आतच, बाजूला उभे असलेले कवी कंदीलकर स्वामीनिष्ठा दाखवण्यासाठी पुढे आले. त्यांना वाटले, हीच संधी आहे राजाला खुश करण्याची. त्यांनी पावशेरसिंहाच्या कानात एक ‘सुपर-डुपर’ आयडिया सांगितली आणि राजाच्या परवानगीने माईक हातात घेतला.
“आणि… आणि समजा… सिंगापूरला पण प्राणी नाही मिळाले,” कंदीलकर उत्साहाने म्हणाले, “तरी तुम्ही काळजी करू नका. आपण सुरुवातीला प्राण्यांचे फायबरचे हुबेहूब सांगाडे उभे करू आणि खाली पाटी लावू – ‘लवकरच येथे खरे प्राणी दिसतील’. लोकांना कल्पना तर येईल की प्राणी कसे दिसतात!”
हे ऐकून पत्रकार आणि उपस्थित जनता अवाक झाली. एका क्षणात सगळीकडे हशा पिकला. विकासाच्या वायफायचा सिग्नल जाऊन तिथे विनोदाचा ‘हॉटस्पॉट’ तयार झाला होता. बोरूबहाद्दरला काही लिहिण्याची गरजच नव्हती, पावशेरसिंह आणि त्यांचे ‘विचारवंत’ स्वतःच आपली कॉमेडी करत होते.
पावशेरसिंहाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. विषय बदलायच्या नादात त्यांनी स्वतःलाच एक ‘विनोदी विषय’ बनवले होते.
- पुढील भागात पावशेरसिंह यांच्या आणखी भन्नाट गोष्टी वाचा…