बोरूबहाद्दरच्या लेखणीने पावशेरसिंहाच्या भ्रष्टाचाराची, घोषणाबाजीची आणि नाकर्तेपणाची लक्तरे वेशीवर टांगली होती. यामुळे जनतेत एक नवी जागृती निर्माण झाली होती. या जागृतीच्या वणव्याला रोखण्यासाठी पावशेरसिंहांनी स्वतःचे Propagandaचे दुकान थाटण्याचा निर्णय घेतला.
पहिला प्रयत्न होता ‘रेडिओ लहरी’! पावशेरसिंहांनी स्वतःच्या आवाजात स्वतःच्याच घोषणा ऐकवण्यासाठी रेडिओ स्टेशन सुरू केले. पण लोकांच्या कानापर्यंत त्या लहरी पोहोचल्याच नाहीत, कारण लोकांच्या रेडिओचे कान दुसऱ्याच फ्रिक्वेन्सीवर होते. तो बार फुसका ठरला.
त्यानंतर ‘पावशेरसिंह माझा’ नावाची वेबसाईट सुरू करण्यात आली. त्याची जबाबदारी पगारी नोकर ‘ढोकीकर’ याच्यावर सोपवली. पण वेबसाईटवर पावशेरसिंहांच्याच फुटक्या घोषणा आणि चमचेगिरीच्या बातम्यांशिवाय काहीच नव्हते. वेबसाईट उघडली की एकच मथळा दिसायचा – ‘महाराजांनी केली ऐतिहासिक घोषणा!’… आत वाचायला गेले तर तीच ती गळक्या बस स्थानकाची किंवा न आलेल्या पाण्याची बातमी! लोकांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. अखेर ती वेबसाईटही बंद पडली.
मग चिरंजीव गब्बरसिंह यांनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी मुंबईतून ‘बोला न्यूज’ नावाचे चकचकीत डिजिटल चॅनल सुरू केले. त्यासाठी कळंबचे, मुद्द्यावर बोलणारे पत्रकार ‘कलम मिरझा’ यांना आणले. मिरझा हुशार होते, त्यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची धमक होती. पण गब्बरसिंहांनी त्यांच्यावर बंधने लादायला सुरुवात केली. “सरकारवर टीका करायची नाही!”, “आपल्या बस स्थानकाची बातमी दाखवायची नाही!”, “फक्त मी खिसा झटकल्यावर काय होईल, हेच दाखवायचे!” या जाचाला कंटाळून अवघ्या तीन महिन्यांत कलम मिरझा यांनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा कळंबला जाऊन ‘मुद्द्याचे’ बोलू लागले. ‘बोला न्यूज’ आता फक्त नावापुरते उरले होते.
‘थिंक टँक’ नव्हे, ‘ब्लँडर बँक’चा जन्म
पावशेरसिंहाची प्रत्येक चाल बोरूबहाद्दरच्या लेखणीपुढे निष्प्रभ ठरत होती. Propagandaचे दुकान चालले नाही, विकासाचे बुडबुडे फुटले आणि डाव अंगाशी आला. आता बोरूबहाद्दरचा आवाज कायमचा बंद करण्यासाठी पावशेरसिंहांनी आपला शेवटचा आणि सर्वात मूर्खपणाचा डाव खेळायचे ठरवले – कायद्याचा बडगा!
त्यांनी आपल्या चमच्यांना आदेश दिला, “कायदा रक्षकाकडे (पोलीस अधीक्षकाकडे) जा आणि बोरूबहाद्दर विरोधात तक्रार द्या. सांगा, त्याची वेबसाईट अनधिकृत आहे आणि त्याच्या संपत्तीची चौकशी करा!”
या महान कार्यासाठी पावशेरसिंहाच्या ‘थिंक टँक’ची बैठक बसली. पण ती ‘थिंक टँक’ नव्हतीच, ती होती एक ‘ब्लँडर बँक’! या बँकेत होते – कवी कंदीलकर, देवी दरबारमधील कंदील (जो देवीला प्रकाश देण्याऐवजी पावशेरसिंहाच्या पापांवर पांघरूण घालायचा), खबरीलाल गारेगार आणि पगारी नोकर ढोकीकर. बैठकीत ढोकीकरने ‘ब्रेकिंग न्यूज’ दिली, “महाराज, ‘आपल्या खबऱ्याने पक्की माहिती दिली आहे की, बोरूबहाद्दरच्या मागे एकही पत्रकार उभा नाही. तो एकटा पडला आहे!” या थंडगार आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून ‘ब्लँडर बँके’ने आपल्या योजनेला अंतिम स्वरूप दिले.
पत्रकारांच्या एकजुटीचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
दुसऱ्या दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि शहरातील पत्रकारांना निरोप गेला, “साडेतीन वाजता कायदा रक्षकांच्या कार्यालयात या, एक महत्त्वाचे निवेदन द्यायचे आहे.”
उत्सुकतेपोटी सर्व पत्रकार जमले. तिथे गेल्यावर त्यांना कळले की, हे ‘महत्त्वाचे निवेदन’ म्हणजे त्यांच्याच पत्रकार बांधव, बोरूबहाद्दर, याच्या विरोधातील तक्रार होती. पत्रकारांना धक्का बसला, पण ते शांत राहिले. ‘ब्लँडर बँके’चे सदस्य पुढे आले. देवी दरबारमधील कंदीलने मोठ्या आवेशाने निवेदन वाचायला सुरुवात केली आणि शेवटी धमकीवजा इशारा दिला, “बोरूबहाद्दरवर तात्काळ कारवाई करा, नाहीतर आमचा संयम सुटेल!”
हा इशारा म्हणजे बारुदाच्या कोठारात टाकलेली ठिणगी ठरला. सर्व पत्रकारांच्या मनात एकच विचार आला – ‘आज बोरूबहाद्दर, उद्या आपण!’ त्यांनी ठरवले, ही लढाई आता फक्त बोरूबहाद्दरची नाही, तर संपूर्ण पत्रकारितेच्या स्वातंत्र्याची आहे.
त्यांनी ‘ब्लँडर बँके’च्या बातमीवर बहिष्कार टाकला. एकाही वृत्तपत्रात किंवा चॅनलवर बोरूबहाद्दर विरोधात बातमी आली नाही. उलट, सर्व पत्रकार एकत्र आले आणि त्यांनी बोरूबहाद्दरच्या बाजूने एक निवेदन तयार केले. त्यांनी कायदा रक्षकांची भेट घेऊन मागणी केली, “एका पत्रकाराला जाहीरपणे धमकी देणाऱ्या या ‘देवी दरबारमधील कंदील’वर आणि त्याच्या साथीदारांवर तात्काळ कारवाई करा!”
या अनपेक्षित ‘सर्जिकल स्ट्राईक’ने कवी कंदीलकर, ढोकीकर आणि त्यांच्या ‘ब्लँडर बँके’चे पितळ पूर्णपणे उघडे पडले.
बोरूबहाद्दरचे ‘ब्रह्मास्त्र’ – संपत्तीची अदलाबदल!
पत्रकारांच्या एकजुटीने बोरूबहाद्दरला हत्तीचे बळ आले होते. आता गप्प बसणे शक्यच नव्हते. त्याने थेट पावशेरसिंहांना आव्हान देणारे ब्रह्मास्त्र सोडले. आपल्या वेबसाईटवर आणि सर्व पत्रकार मित्रांच्या माध्यमातून त्याने एक जाहीर आव्हान दिले:
“पावशेरसिंह, तुम्ही माझ्या संपत्तीची चौकशी करायला निघालात. पण आधी सांगा, तुमचे ‘पावशेरसिंह माझा’ आणि ‘बोला न्यूज’ हे कायदेशीर आहेत का? चला, एक काम करूया. मी माझी सर्व संपत्ती तुमच्या नावावर करतो, तुम्ही तुमची सर्व संपत्ती माझ्या नावावर करा. मी तुम्हाला वचन देतो, तुमच्याकडून आलेला एक-एक रुपया मी धाराशिवच्या गोरगरिबांना वाटून टाकेन. आहे का हिंमत?”
या एका आव्हानाने पावशेरसिंहाच्या उरल्यासुरल्या इभ्रतीची लक्तरे निघाली. बोरूबहाद्दरबद्दल जनतेच्या मनात असलेला आदर दुणावला. एका बाजूला सर्व संपत्ती गरिबांना वाटायला तयार असलेला एक पत्रकार होता आणि दुसऱ्या बाजूला मागास जिल्ह्याला लुटून खिसे भरणारा एक राजा होता.
पावशेरसिंह आणि त्यांची ‘ब्लँडर बँक’ या आव्हानापुढे पूर्णपणे उघडी पडली होती. त्यांच्याकडे आता उत्तर देण्यासाठी शब्द नव्हते आणि तोंड लपवायला जागाही उरली नव्हती.